मेहरूण तलावात मासेमारीस गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू
जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क I

शहरातील मेहरूण तलावात मासेमारीस गेलेल्या एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव काझी अब्दुल वाहिद रईस अहमद (वय ४५, रा. फातिमा मस्जिद जवळ, मेहरूण, जळगाव) असे आहे. ते मशिदीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे.
माहितीनुसार, मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी अब्दुल वाहिद मासेमारीसाठी मेहरूण तलावाकाठावर गेले होते. मात्र, अचानक पाय घसरल्याने ते पाण्यात पडले आणि बुडाले. त्यानंतर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर बुधवारी त्यांच्या मृतदेहाचा तलावात शोध लागला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवला.


