राज्यात गोवरचा उद्रेक; १० हजार संशयित रुग्ण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना संकटांनंतर आता राज्यात (Maharashtra) गोवरचा (Measles Disease) उद्रेक होत आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ (Measles Disease outbreak) झाली आहे.

राज्यात आतापर्यंत १० हजार २३४ गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ६५८ रुग्णांना निश्चित गोवर झाल्याचे निदान झाले आहे. तर १३ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. राज्यात मुंबई (Mumbai), मालेगाव (Malegaon), भिवंडी (Bhiwandi), ठाणे (Thane) हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबईत सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी २५ नोव्हेंबरपर्यंत १० हजार २३४ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत १०, भिवंडीत २ तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १३ मृत्यूंपैकी ९ संशयित तर ४ निश्चित निदान झालेले मृत्यू आहेत. आतापर्यंत ६ मुलींचा तर ७ मुलांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात बिहार (Bihar), गुजरात (Gujarat), हरियाणा (Haryana), झारखंड (Jharkhand), केरळ (Kerala) आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central government) परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय घ्यावा तसेच ६ महिन्यावरील बालकांना अतिरिक्त लसीचा डोस द्यावा अशा सूचना केल्या आहेत.

ज्या भागांमध्ये सहा महिने ते नऊ महिन्यापेक्षा लहान बाळांमध्ये गोवर रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशा भागामध्ये सहा महिने ते नऊ महिन्यांहून लहान वयांच्या बाळांमध्ये गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी. या अधिकच्या मात्रेनंतरही या बालकांचे गोवर आणि रूबेला लसीकरण नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार करण्यात यावे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.