लोकशाही संपादकीय लेख
अलीकडे शिक्षणाच्या संदर्भात शासन स्तरावर दुर्लक्ष होत असताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमुळे ग्रामीण भागात एक उत्साहावर्धक वातावरण निर्माण झाले आहे. तालुकास्तरावरील ग्रामीण भागातील खाजगी शिक्षण संस्था क्षेत्रातील पहिले पारितोषिक जैन उद्योग समूहाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलला मिळाले. त्याचे वितरण जिल्हा नियोजन भावनात पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. ग्रामीण भागात शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा अभियान गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन अशा प्रकारच्या स्पर्धांचे अभियान राबवण्यात येत आहे. हा एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. जैन उद्योग समूहाच्या वतीने चालविण्यात येणारी अनुभूती स्कूल एक नामांकित शाळा होय. जळगावचा मोठा उद्योग चालवताना, यात कोट्यावधी रुपयांची कमाई होत असताना जैन उद्योग समूह शिक्षणासारखी संस्था आदर्श पद्धतीने चालवते. त्यातून त्यांना उद्योगासारखा नफा वगैरे मिळवणार नाही. तथापि आपल्या भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने जैन उद्योग समूहाचे संस्थापक विचारवंत कै. भवरलालजी जैन यांनी ही संस्था स्थापन केली.
जैन उद्योग समूहातील उद्योगांबरोबरच ही संस्था आदर्श पद्धतीने चालवण्याचे स्वप्न भवरलालजी यांचे होते. अनुभूती शिक्षण संस्था ही त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. आपल्या नातवाला शिक्षण देण्यासाठी चांगल्या शैक्षणिक संस्थेचा शोध घेण्यासाठी देशभरात त्यांनी भ्रमण केले. बोटावर मोजणे इतक्याच शाळा त्यांना आढळून आल्या. त्यावेळी भवरलालजी यांना वाटले की माझ्याकडे पैसा आहे, म्हणून मी चांगल्या शाळांना शोध घेऊ शकतो आणि चांगल्या शाळेची फी देऊन तेथे मी माझ्या नातवाला शिकवू शकतो. परंतु सर्वसामान्यांचे ? काय हा विचार त्यांना सतत सतावत होता. म्हणून त्यांनी उद्योग समूहाच्या माध्यमातून सुमारे 100 एकर प्रशस्त जागेत ही अनुभूती इंग्लिश मीडियम निवासी शाळा सुरू केली आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने ही शाळा प्राथमिक पासून ते आता बारावीपर्यंत चे शिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने देत आहे. शाळेतील वर्गाची रचना उत्तम पद्धतीने केली गेली आहे. शाळेच्या शंभर एकर परिसर म्हणजे जणू निसर्गरम्य वातावरण आहे. संपूर्ण परिसर गर्द झाडीने फुलविण्यात आला असून शाळेच्या खोल्या ह्या एसी शिवाय थंड वातावरणात राहतील अश्या निर्माण करण्यात आल्या आहेत. अनुभूती स्कूलच्या परिसरात प्रवेश करतात शिक्षणाचे वातावरण मंत्रमुग्ध करते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चांगले तज्ञ अनुभवी शिक्षक नेमण्यात आले आहेत.
शिक्षणाबरोबर क्रीडा, कला, संस्कृती क्षेत्रातही विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ज्ञानामुळे फक्त शिक्षण गुणाची टक्केवारी घेण्याबरोबरच जीवनाच्या इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांची घोडदौड चालू असते. अनुभूती शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेऊन फक्त नोकऱ्या करणारे विद्यार्थी निर्माण होणार नाही, तर नोकऱ्या देणारे विद्यार्थी निर्माण केले जातात. ही संकल्पना उद्योगपती कै. भवरलालजी जैन यांची होती. शिक्षणाबरोबरच चांगला माणूस या शाळेत घडेला पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यासाठी अनुभूती शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर भवरलालजी दररोज एकत्र भेटून त्यांचेही संवाद साधत होते. सायंकाळी अथवा सकाळी जेव्हा भवरलालजी या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधायचे तेव्हा या आजोबाच्या संवादासाठी विद्यार्थी उत्सुक असायचे. अशाप्रकारे शिक्षणामध्ये भवरलालजी विद्यार्थ्यांमध्ये रमामांड झाले होते.
कुठल्याही बाबतीत त्याग केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही असे म्हणतात ते खरे आहे. कै. भाऊंच्या त्यागाला मेहनतीला फळ आले. आज अनेक बाबतीत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल अनेक प्रकारचे यश पादाक्रांत करीत आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविले आहे. विविध क्षेत्रात या स्कूलने आपले यश प्राप्त केले आहे. शाळेतील विद्यार्थिनी शिक्षणात अनेक स्तरावर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षणातील अनेक स्तरांवर बक्षीस मिळवली आहेत. क्रीडा क्षेत्रात मजल मारली आहे. अनेक विद्यार्थी या स्कूल मधून बाहेर पडल्यानंतर नोकरी तर प्राधान्याने मिळवलीच तथापि नोकऱ्या देणारे उद्योजक बनले आहेत. ही एक अभिमानास्पद बाब आहे. कै. भवरलालजी यांचे स्वप्न साकार होते आहे. त्यांची स्मृती विद्यार्थ्यांना सतत प्रेरणादायी ठरणारी आहे. कै. भवरलालजींच्या चारही सुपुत्रांनी कै. भाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत अग्रस्थानी राहतात हे विशेष होय..!