
लोकशाही संपादकीय लेख
पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तीन रुपयांनी वाढ झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचा संदेश दिला. त्यात दोन कार असताना एकच कारचा उपयोग करावा, दोन मोटरसायकल असतील तर एकच मोटरसायकलचा वापर करावा, ज्यांच्याकडे ई कार असतील, ई बाइक असतील त्यांनी त्यांचा वापर करावा असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला. त्यानंतर जळगावच्या महापौर म्हणजे प्रथम नागरिक दीपमाला काळे यांनी त्यांच्या सरकारी वाहना व्यतिरिक्त टू व्हीलर वर ऑफिसला यायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे दोन सरकारी वाहनांपैकी एक वाहन वापरणे बंद केले आणि महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनाही सूचना केली की, ज्यांच्याकडे ई-बायिक आहे त्यांनी ई-बाईकवर कार्यालयात यावे तसेच दोन जणांनी मिळून एका वाहनात वर कार्यालयात येण्याचे शक्य असेल तर तसे करावे. शेअरिंग वाहनाद्वारे दोन जणांनी मिळून एक वाहन वापरणे चालू करावे, त्याचबरोबर आठवड्यातून एकदा वाहनाशिवाय कार्यालयात यावे. म्हणजे आठवड्याला बुधवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळावा, असे महापौर यांनी सांगितले. इंधनाची बचत करण्यासाठी महापौरांच्या या सूचना अत्यंत योग्य आहेत. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर तीन रुपयांनी महागल्या आहेत. त्याचबरोबर इंधनाची टंचाई निर्माण होण्याऐवजी त्याला आळा घालण्यासाठी सदर इंधन बचतीचा उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महापौर आपल्या ई टू व्हीलरने जेव्हा कार्यालयाकडे निघाल्या तेव्हा सर्वजण त्यांना पाहण्यासाठी उत्सुक होते. पहिले एक दोन दिवस हा प्रकार होईल, त्यानंतर कोण कुणाकडे पाहणार सुद्धा नाही. महापौरांच्या इंधन बचतीच्या सूचनेचा काही अंशी वापर जर महापालिकेतील कर्मचाऱ्यांकडून करता आला तर फार मोठी उपलब्धी होईल असे म्हणता येईल. त्याचबरोबर जळगावचे प्रथम नागरिक आपल्या बाईकवर कार्यालयात ये जा करत असल्याचे पाहून शहरातील काही नागरिकांनी त्यांच्या आदर्श घेतला तर फार मोठी उपलब्ध झाली असे म्हणता येईल. हा संदेश फक्त जळगावकरांनाच असेल असे नाही तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये म्हणजे जिल्ह्यातील इतर गावांमध्ये होऊन जिल्ह्यातील काही लोकांनी जरी त्याचे अनुकरण केले तरी चांगला परिणाम होईल. एकंदरीत एका संदेशाने जिल्ह्यात सकारात्मक परिणाम होईल आणि त्याचा इंधन बचतीवर परिणाम होईल यात शंका नाही.
इंधन बचतीच्या संदेशाबरोबरच मोदींनी आणखी काही संदेश दिले आहेत. शक्यतोवर परदेशात प्रवास करण्याचे टाळा. म्हणजे परदेशात जाण्यावर बंदी घाला. आवश्यक असेल तेथेच परदेश प्रवास करा. म्हणजे परदेशात पर्यटन करणे टाळा. महत्त्वाचा प्रदेश प्रवास असेल तरच तो करा, असा संदेश मोदींनी दिला आणि तो संदेश सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर विमान प्रवास करणे शक्यतो टाळा. तसेच जेथे रेल्वे किंवा सार्वजनिक वाहनावर प्रवेश करणे शक्य आहे तेथे सार्वजनिक वाहनाने प्रवास करावा. यातून इंधनात फार मोठी बचत होऊ शकेल. परदेश प्रवास टाळण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या असल्या तरी राजकीय लोकांवर त्याचा कितपत परिणाम होईल? हे सांगता येणार नाही. राजकारणी लोकांना स्वतःच्या खिशातून पैसे देऊन प्रवास करायचा नसतो. त्यामुळे राजकारणी लोकांच्या प्रवासावर बंदी घालणे आवश्यक आहे. तसेच राजकारणी लोक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वाहन वापरावर कटोती करण्याची गरज आहे आणि ती करण्याची आवश्यकता देखील आहे. राजकारण्यांकडे आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे शासकीय वाहना व्यतिरिक्त दोन वाहने त्यांच्या घरी असतात. त्या वाहनांवर सुद्धा बंदी आणणे आवश्यक आहे एकंदरीत देशाची अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचे चित्र असून त्यासाठी आता सर्वांवर बंदी आणणे आवश्यक आहे. पांढरपेशा समाजावर अथवा समाजातील मध्यमवर्गावरच बंदी आणण्यापेक्षा जे बडे बडे व्यापारी उद्योगपती आहेत, त्यांच्यावर सुद्धा इंधन बचतीची काटकसर करण्याची गरज आहे. ती केली पाहिजे असे आम्हाला वाटते. सरकारी कार्यालयांमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी वातानुकूलित वापरावर थोडे बंधन आणणे आवश्यक आहे. ज्या कार्यालयात कुणीही नसते तेथे वातानुकूलित मशीन चालू असतात. त्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. तरच इंधन बचत होईल अन्यथा आंधळं जळतंय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था व्हायला नको..!

