जळगावात महापौर सांस्कृतिक महोत्सवाची मेजवानी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित “महापौर सांस्कृतिक महोत्सव ” येत्या 13, 14 आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील कलावंतांना कोरोना महामारीमुळे आपली कला सादर करण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती. तसेच नृत्य, गायक, वादक यासह इतर कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी काही कलावंतांनी महापौर यांच्याकडे कल्पना मांडली आणि महापौर जयश्रीताई सुनील महाजन यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

जळगाव शहरात कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगीतप्रेमी व महापौर जयश्री महाजन यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. जळगावकरांना नाविन्यपूर्ण उपक्रम बघता यावे, रसिकांची गरज पूर्ण व्हावी, त्यांना उत्तमोत्तम कार्यक्रमाची मेजवानी मिळावी हा “महापौर सांस्कृतिक महोत्सव” घेण्यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराष्ट्रात जळगाव नगरीला सांस्कृतिक नगरी असे म्हटले जाते. आपल्या जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंत कलाकार राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवत असून जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

या सांस्कृतिक महोत्सवात दि. 13 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 10:30 वाजता व. वा. वाचनालय, रेल्वे स्टेशन रोड येथील नवीन सभागृहात सोलो डान्स (12 वर्षाखालील मुले / मुली), सोलो डान्स 13 वर्षांखालील मुले / मूली तसेच समूह नृत्य स्पर्धा (ग्रुप डान्स) खुला गट अशा स्पर्धा होतील. सायंकाळी 6 वाजता (ब्लॅक अँड व्हाईट) चित्रपटातील गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होईल. स्थळ व.वा. वाचनालयाचे नवीन सभागृह असेल. दि. 14 ऑगस्ट रविवार रोजी व.वा. वाचनालय रेल्वे स्टेशन रोड येथील सभागृहात सकाळी 10:30 वाजता गीतगायन स्पर्धा खुला गट (करावोके) तर दुपारी 2 ते 4 या वेळेत ‘ द ग्रेट मॉम (केवळ महिलांसाठी) नृत्य स्पर्धा होतील. ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरेल. याच दिवशी दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतरत्न गानकोकीळा स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल.

दि . 15 ऑगस्ट सोमवारी सकाळी 11 वाजता “आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमाअंतर्गत देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम होणार आहे, हा देखणा कार्यक्रम जळगाव येथील महाबळ कॉलनी रोडवरील छत्रपती राजे संभाजी नाट्यगृहात होईल. या भव्यदिव्य सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील अनेक कलावंत सहभागी होणार आहेत, ही आनंददायी बाब आहे.

प्रवेशासाठी जोशी स्पोर्ट्स, विजया बँकेशेजारी, नवीपेठ जळगाव तसेच 9860303888, 9405057141, 8669343415  तसेच 9423487653  या भ्रमण ध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या महोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे असे महापौर जयश्रीताई सुनील महाजन, ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष तथा जेष्ठ कलावंत मोहन तायडे, सचिव तुषार वाघुळदे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रभाकर जाधव, संघपाल तायडे, दीपक नाटेकर, वर्षा चौधरी, पूजा सोनवणे, गायत्री नाटेकर, लक्ष्मी नाटेकर, तुषार वाघुळदे, मोहन तायडे यांची उपस्थिती होती. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ऑर्केस्ट्रा कलाकार, असोसिएशनचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील कलावंत अथक परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.