वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील भूमिगत गटार प्रकल्प योजना तातडीने मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी करत राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेऊन साकडे घालण्यात आले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन वरणगाव शहरातील भूमिगत गटार योजना तातडीने मार्गी लावावी, अशी विनंती केली. भूमिगत गटार प्रकल्प योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करून त्यातील त्रुटी दूर करण्यात आल्या असून तो राज्याच्या एस.एल.टी.सी. समितीसमोर सादर करण्यात आला आहे. आता या प्रस्तावावर एस.एल.टी.सी. समितीने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
शहरातील रस्ते पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनमुळे खोदलेले आहेत. त्याचबरोबर भूमिगत गटार योजना राबवून जनतेला मूलभूत सुविधा देणे तितकेच महत्त्वाचे आहे. वारंवार नवीन रस्ते तयार करून पुन्हा खोदकाम केल्यास शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे सध्याच भूमिगत गटार प्रकल्प मंजूर होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने मार्ग काढून वरणगावकरांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांना निवेदन देऊन नगराध्यक्षांनी साकडे घातले. यावेळी जनसेवक अजमल खान, जनसेवक फजल शेख, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश निमकर यांच्यासह कार्यकर्ते मुंबई मंत्रालय येथे उपस्थित होते.


