लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जळगाव जात-पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर भुसावळ पालिका प्रशासनाने नगराध्यक्षांचे शासकीय वाहन आपल्या ताब्यात घेतले आहे. या कारवाईने शहरातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जळगाव जात पडताळणी समितीमार्फत सखोल चौकशी केली. गुरुवार दि. 23 एप्रिल रोजी समितीने आपला निकाल देत भंगाळे यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला. या निर्णयामुळे नगराध्यक्ष पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
समितीच्या निर्णयानंतर मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळताच त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानंतर रविवारी रात्री अग्निशमन विभाग प्रमुख विवेक माकोडे आणि त्यांच्या पथकाने गायत्री भंगाळे यांच्या वापरासाठी असलेले पालिकेचे चारचाकी शासकीय वाहन अग्निशमन विभागात जमा केले.


