लोकशाही संपादकीय लेख

महापौर दीपमाला काळे यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून महापालिकेत एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले आहे. सर्वप्रथम त्यांनी लेटलतीफ कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. सकाळी दहा वाजेपासूनच मुख्य गेटवर उभे राहून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. अनेक कर्मचारी दहा-साडेदहा नंतर कार्यालयात आले. त्या सर्व लेट लतीफ कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा समज देऊन सोडून देण्यात आले. यापुढे असे झाले तर मात्र खैर नाही अशा सूचना वजा आदेश देण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून दहा वाजता सर्व कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात हजर झाले. त्यामुळे ते आता वेळेवर हजर होतील. काम करण्याची पद्धती महत्त्वाची आहे. एक दिवस अचानक गेटवर हजेरी घेतली की सर्व कर्मचारी वेळेवर कामावर येतात. प्रश्न साधा आहे. आपली ड्युटी दहा वाजेची असताना साडेदहा ते पावणे अकरा पर्यंत कामावर येण्याची ही कुठली पद्धत? शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात तशातला हा प्रकार होय. लेट लतीफ कर्मचाऱ्यांनंतर महामार्गावरील कचरा प्रश्नाकडे महापौरांनी आपली मोर्चा वळविला. महामार्गावर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येईल, अशी तंबी दिली त्यानंतर महामार्गावर कचरा टाकणे लोकांनी कमी केले. कचरा हा कचराकुंडीत टाकावा अथवा घंटागाडी मध्ये टाकावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या त्यानंतर कचरा रस्त्यावर टाकण्याचे प्रमाण कमी झाले. महापौरांनी आपला मोर्चा अतिक्रमणाकडे वळवला. शिरसोली रोडवरील आदिवासी समाजाने झोपड्यांचे केलेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न झाले. दोन दिवस लागोपाठ अतिक्रमणाचे पथके पाठवून त्या झोपड्या उठवून महापालिकेची जागा मोकळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव घातला आणि त्यांच्याकडून वदवून घेतले, की झोपड्या ‘जैसे ‘थे राहतील जोपर्यंत कोणी हात लावणार नाही. त्यामुळे झोपड्या काढण्याचा प्रयत्न फसला. तेथे झोपड्यां काढण्यामागे अडथळा आहे आणि झोपड्या काढल्या गेल्या नाहीत. परंतु महामार्गावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात त्या यशस्वी झाल्या. सुरुवातीला अजिंठा चौफुलीवरील अतिक्रमण काढले. अजिंठा चौक साफ करण्यात आला. त्यानंतर भंगार बाजार आणि ईदगाच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यात त्यांना यश आले. अतिक्रमण काढताना काही वेळ परिस्थिती हाताबाहेर गेली, पण अतिक्रमण विभाग, नही विभाग आणि पोलीस फौज फाट्याच्या सहकार्याने ते अतिक्रमण साफ करण्यात आले. त्यानंतर अतिक्रमण काढण्याचा दुसरा टप्पा आता शिवाजी चौक ते प्रभात चौक पर्यंत समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. समांतर रस्त्यांवर बेकायदेशीर टपरी वजा दुकाने थाटून व्यवसाय करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली. जेसीबी मार्फत सर्व अतिक्रमण काढून महानगरपालिकेत ते जमा करण्यात आले. अजूनही अतिक्रमण मोहीम ही चालूच राहणार आहे.
महापौर दीपमाला काळे यांनी एक गोष्ट केली की, आता पावसाळ्यात जळगावकरांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी भाऊंचे उद्यान येथील 80 फूट उंच टाकीवर चढून त्यामध्ये असलेला एक फूट इतका गाळ स्वच्छ करण्यासाठी स्वतः कर्मचाऱ्यांसोबत टाकीत उतरून ते त्यांनी साफ करून घेतले. ही फार मोठी बाब म्हटली पाहिजे. पाण्याच्या टाक्या जर स्वच्छ केल्या नाहीत तर जळगावकरांना स्वच्छ पाणी शुद्ध पाणी कसे मिळेल? त्यासाठी आपण स्वतः टाकीत उतरून टाकी साफ करून येणाऱ्या महापौर कदाचित दीपमाला काळे या पहिल्याच असतील. एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर महिन्यातून एकदा होणारी महासभा महिन्यातून दोन वेळा म्हणजे पंधरा दिवसांनी एकदा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याबाबत दीपमाला काळे म्हणाल्या की, नवीन महानगरपालिकेत तरुण सभासदांची संख्या जास्त आहे. त्यांचे काम करण्याचा उत्साह पाहिला तर आपल्या वॉर्डातील कामे करण्याचा त्यांचा पवित्रा चांगला आहे. जर महिन्यातून एकदाच महासभा झाली तर या तरुण सभासद नगरसेवकांचा उत्साह कमी होईल. म्हणून पंधरा दिवसाला एक महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन सभासदांच्या वतीने ही फार चांगली बाब म्हटली पाहिजे. एकंदरीत महापौर ॲक्शन मोड मध्ये आल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत चांगले काम करण्याची संधी त्या घेत आहेत. महापौरपदी अगदी कमी कालावधीपासून त्या रुजू झाल्या असल्या तरीसुद्धा वेगवेगळ्या कल्पना राबवण्याचा त्यांचा प्रयत्न हा स्तुत्य आहे. रस्ते, भुयारी गटारी योजना आणि गटारींचे काम करण्यासाठी कालावधी लागणार आहे. भुयारी गटारीचे काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत रस्त्यांची कामे होणार नाही. 50 दिवसांवर पावसाळा आला आहे. त्यानंतर रस्त्यांची कामे होणार नाहीत. त्यामुळे यंदाही चिखलातूनच जळगावकरांना जावे लागणार आहे. त्यामुळे रस्त्याची कामे पूर्ण झाली नसल्यामुळे जळगावकरांना खराब रस्त्यांचा ताप सहन करावा लागणार आहे. रस्त्यासोबतच स्ट्रीट लाईट प्रश्न महापौर दीपमाला काळे यांनी हाती घ्यावा. अजूनही काही कॉलनी परिसरात स्ट्रीट लाईट ऐवजी अंधारात तेथील रहिवासी दिवस काढत आहेत. त्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. पाण्याच्या बाबतीत दररोज पाणी देणे शक्य आहे काय? ते बघावे. दररोज देणे शक्य असेल तर वॉटर मीटर लावणे फायद्याचे आहे. अन्यथा हा वॉटर मीटरचा भुर्दंड कशासाठी? दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा केला तरी चालेल. आरोग्य आणि हिरवेगार जळगाव करण्यासाठी आता पावसाळ्यात प्रयत्न झाला पाहिजे, तो करावा एवढी विनंती..!


