अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थानच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर बुधवारी रात्री ८-३० वा. आग लागली. आगीने भीषण रुप धारण केले. तशातच त्या भागात वीज गेली. निमुळते रस्ते, अंधारात एकच गोंधळ उडाला. ही आग विझवितांना अडथळे येत गेले. अमळनेरचे हे ग्राम दैवत आहे आणि त्याला भीषण आग लागल्याचे वृत्त शहरात पसरताच असंख्य अबाल वृद्ध वाडी चौकात धावत सुटले. अनेक हात मदतीला धावून आले. मध्येच पावसाच्या सरी कोसळल्या अखेर तासाभरात ही आग आटोक्यात आली.
वरच्या मजल्यावर हभप प्रसाद महाराज उर्फ ११ वे सखाराम महाराजांच्या बैठकीचे ठिकाण आहे. त्या स्थळालादेखील या आगीची झळ पोहचल्याची आशंका व्यक्त केली जात आहे. बुधवारीच दुपारी संत सखाराम महाराज पैलतीरावरील तुळसी बागेतून पंढरपूरच्या पायी वारीला सालाबादप्रमाणे निघाले आहेत. आणि रात्री त्यांच्या पश्चात ही आग लागल्याची घटना घडली आहे.
आधी पांडुरंग ! प्रसाद महाराज माघारी नाहीच!
शेकडो वर्षापूर्वीचे मंदिर असून आगीत जळाले मात्र प्रसाद महाराजांची दिंडी थांबली नाही. आधी पांडुरंग महत्वाचा म्हणत महाराज माघारी फिरलेच नाहीत. स्वतःची आईचे निधन झाले होते तरी प्रसाद महाराज माघारी फिरले नव्हते पांडुरंगाच्या भक्तीपूढे सारे दुःख आणि विश्व छोटे आहे. संतांना दुःख, आनंद, मोह माया काहीच नसते.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन दलास घटनास्थळी पाठवले. ते स्वतःही दाखल झाले अग्निशमन शमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यास सुरवात केली. याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने आग विझविण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. आमदार अनिल पाटील यांनी चोपडा, शिरपूर, पारोळा येथील गाड्या पाठविण्याची विनंती केली. पारोळा पालिकेची गाडी तातडीने दाखल झाली. अमळनेर शहर पत्रकार संघाने सोशल मीडियावर खाजगी टँकर धारकांना आवाहन केले. आमदार अनिल पाटील यांनी आर बी कास्ट्रक्शनचे टँकर पाठविले.
पालिकेच्या वतीने नगरसेवक अनिल महाजन, पंकज चौधरी, बाळा संदनशिव, पंकज भोई, गोपी कासार, सूरज परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकुर, नितीन निळे, विजय पाटील, संजय कौतीक पाटील, महेंद्र पाटील, शोएब शेख, अरशद खान, हुजैफा पठान, इमरान पठान, नईम पठान, नसीब पठान, राजा पठान फरहान शेख, आकिब पठान, रिजवान खान यासह अनेकांनी मदतकार्य केले. इथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम स्वतः घटनास्थळी येऊन नियंत्रण करीत होते. डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलीस ताफ्यासह येऊन गर्दी आटोक्यात आणली त्यामुळे अग्निशमन दलास सोईचे झाले.
बरेच जळाले पण देव शाबूत राहिले
सर्व काही जळाले होते मात्र वाडी संस्थानातील देव मात्र शाबूत राहिले. याबद्दलही आश्चर्य आणि आनंद व्यक्त केले जात आहे. दरम्यान मंदिराचे नुकसान झाले असल्याने स्टारक्चरल ऑडिट होत नाही तोपर्यंत काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद असेल अशी माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी चर्चेअंती दिली.


