लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताशेजारी असणाऱ्या म्यानमारमध्ये अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडली आहे. एका गावात झालेल्या शक्तिशाली स्फोटात ५५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा भयंकर होता की यामध्ये शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण म्यानमारमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतरचे भयावह आणि थरारक फोटो समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर १०० पेक्षा जास्त घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कसा झाला आणि यामागे कोणाचा हात आहे का? याचा तपास स्थानिक सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
रविवारी ईशान्य म्यानमारमध्ये खाणकामासाठी लागणारी स्फोटके ठेवलेल्या एका इमारतीत अचानक स्फोट झाला. चीनच्या सीमेपासून ३ किमी नामखम टाउनशिपमधील काउंगटुप गावात हा स्फोट झाला. हा परिसर म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाखालील सरकारशी लढणाऱ्या ता’आंग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. स्फोटाचे कारण तात्काळ समजू शकले नाही. मात्र, त्या इमारतीत खाणकामासाठी वापरण्यात येणारी स्फोटके साठवलेली होती, असे सांगण्यात आले आहे.


