लोकशाही न्यूज नेटवर्क

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतलज नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो कोटींच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. किन्नौर जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. पुराच्या प्रचंड प्रवाहात सुमारे 100 कोटी रुपये खर्चून उभारलेला लोखंडी पूल पाण्याखाली गेला असून, या घटनेमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पूरामुळे अनेक गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीकाठावरील घरे, मालमत्ता आणि शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. प्रभावित भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आणि आवश्यक मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून, हवामान विभागानेही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक भाग जलमय झाले आहेत. पुराच्या वेगामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, भयानक पुरात तब्बल 500 वाहने वाहून गेल्याची माहिती समोर आली असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू असून काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुराचा वेग अधिक असल्याने अनेक ठिकाणी संपर्कही तुटल्याची माहिती मिळत आहे.
सोशल मीडियावर या पुराचे अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामध्ये प्रचंड वेगाने वाहणारे पाणी आणि त्यात वाहून जाणारी वाहने दिसत आहेत. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन पुढील काही तास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


