भुसावळ : शहरातील स्टेट बँक मुख्य शाखेजवळील परिसरात सावकारे बिल्डिंग मध्ये एका विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित दीराविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, 27 वर्षीय महिला दि. 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता जामनेर रोडवरील इमारतीत घरातील काही साहित्य घेण्यासाठी गेली होती. इमारतीच्या जिन्याला कुलूप असल्याने तिने तेथे उपस्थित असलेल्या दीराकडे चावी मागितली. मात्र, त्याने चावी देण्यास नकार देत तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीनुसार, आरोपीने महिलेचा हात पकडून तिला जबरदस्तीने ओढत तिच्या विनयाला धक्का लागेल असे कृत्य केले. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने आरडाओरड करून स्वतःची सुटका करून घेतली आणि तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून आरोपी मयूर संजय कुमार सावकारे याच्या विरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस पारिसकर करत आहेत.


