जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विवाहितेला माहेरहून कार घेण्यासाठी पाच लाख रूपये व महागड्या वस्तू आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शिवाजी नगरात माहेर असलेल्या दिपाली कुणाल अहिरे (वय २८) यांचा विवाह मालगाव येथील कुणाल शिवाजी अहिरे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले.
दरम्यान, पती कुणाल याने विवाहितेला कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे अशी मागणी केली. मात्र पैशांची पुर्तता न केल्याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच विवाहितेच्या अंगावरील ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच सासू व सासरे यांनी देखील पैश्यांसाठी तगादा लावला.
हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने जळगावातील शिवाजी नगरातील माहेरी निघून आल्या. सोमवारी २१ मार्च रोजी विवाहितेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती कुणाल शिवाजी अहिरे, सासू करूणा शिवाजी अहिरे, सासरे शिवाजी चिला अहीरे सर्व रा. मालेगाव जि.नाशिक यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरूण सोनार करीत आहे.