चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

समाजातील रूढी-परंपरा आणि टीकेच्या दबावाला न जुमानता, मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील २९ वर्षीय युवक अजय रुपदेव मोहुर्ले यांनी एक वेगळा आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी एका विधवा महिलेशी विवाह करून तिच्या लहान मुलीसह तिला स्वीकारत माणुसकीचा जिवंत आदर्श घालून दिला आहे.
आजच्या काळात विवाह अनेकदा आर्थिक स्थिती, प्रतिष्ठा आणि सामाजिक अपेक्षांवर आधारित असतो. मात्र अजय यांनी या चौकटी मोडून मानवी मूल्यांना अग्रक्रम दिला. त्यांच्या या निर्णयामुळे एका महिलेच्या आयुष्यात नव्या सुरुवातीची संधी निर्माण झाली, तर एका निरागस मुलीला वडिलांचे प्रेम मिळाले. मात्र, सासरच्या काही सदस्यांकडून मुलीला सोबत पाठवण्यास अनिच्छा व्यक्त केल्याने परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे.
या सकारात्मक कृतीनंतरही काही ठिकाणी टीका आणि विरोधाचा सूर उमटताना दिसतो. विधवा महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही पूर्णपणे बदललेला नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित करणे, त्यांना दुय्यम स्थान देणे या गोष्टी अजूनही समाजात दिसून येतात.
अजय रुपदेव मोहुर्ले यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्टपणे सांगितले की, “एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आपण पुढे आलो, तर त्यात चुकीचं काही नाही. पैसा तात्पुरता असतो, पण माणुसकी कायम टिकणारी आहे.” त्यांच्या या विचारांनी समाजातील दुटप्पी मानसिकतेवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या आयुष्यातील निर्णय नसून, व्यापक सामाजिक बदलाची दिशा दाखवणारी आहे. विधवा महिलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मान आणि समानतेने स्वीकारण्याची गरज असल्याचा ठाम संदेश यातून मिळतो. एकंदरीत, अजय रुपदेव मोहुर्ले यांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, बदलत्या विचारसरणीची नवी पहाट ठरू शकतो, अशी भावना व्यक्त होत आहे.


