बाजार समिती निवडणुकांत जिल्ह्यातील नेत्यांची परीक्षा

0

लोकशाही, संपादकीय लेख

 

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार येऊन नऊ महिने झाले. पहिल्यादाच महाराष्ट्रातील बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. सहकार क्षेत्रातील या निवडणुका असल्या तरी बाजार समितीत आपली सत्ता मिळवणे तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आतापर्यंत बहुतेक बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व होते. गेल्या वर्षभरापासून बाजार हा बाजार समिती प्रशासकाच्या ताब्यात आहे. बाजार समिती निवडणुका म्हणजे शिंदे फडणवीस सरकारसाठी रंगीत तालीम म्हणता येईल. प्रत्येक तालुक्यात बाजार समितीचे कार्य शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण १५ तालुक्यात मिळून १२ कृषी उत्पन्न बाजार समिती या कार्यरत आहेत. या सर्व निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांचे एक पॅनल विरुद्ध शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे एक पॅनल अशा सरळ पॅनल मध्ये या लढती होणार असल्याच्या स्पष्ट हालचाली सुरू आहेत. त्यात सर्वच पक्षातील काही नाराज कार्यकर्ते बंडखोरी करून दुसऱ्या पॅनल मध्ये उड्या मारू शकतात. जसे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी बंडखोरी करून शिंदे फडणवीस गटाशी हात मिळवणी करून अध्यक्षपद पटकावले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांच्या आशीर्वाद घेतले, असे प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishore Appa Patil) यांचे कडून स्वतंत्र पॅनल करून निवडणूक लढण्याची जोरदार तयारी चालू आहे. तथापि आमदार किशोर पाटलांना भाजपचे माजी सभापती सतीश शिंदे, अमोल शिंदे यांची साथ मिळणे अवघड असल्याने किशोर आप्पा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ (Dilip Wagh) यांच्याशी हात मिळवणे करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्यात एक दोन बैठकी झाल्या परंतु त्या फिस्कटल्याने किशोर आप्पांच्या विरोधात सतीश शिंदे, अमोल शिंदे यांची जोरदार तयारी चालू असून शिवसेना उद्धव गटाच्या नेत्या निर्मला सीड्सच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी यांचे बरोबर मिळून किशोर पाटलांच्या विरोधात पॅनल करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पाचोरा बाजार समिती निवडणुकीत स्थानिक राजकीय नेत्यांचा पॅनल तयार करण्याकरिता कस लागणार आहे. चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सुरू आहे. एडवोकेट घनश्याम अण्णा पाटील यांना चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन करण्याचे अरुण भाई यांनी आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी शब्द पाळला नाही. म्हणून घनश्याम पाटील नाराज असून ते पक्षाबरोबर बंडखोरी करतील, असे चिन्ह आज तरी दिसून येते. एडवोकेट घनश्याम पाटील अजित पवारांना भेटले असल्याचे कळते. त्यानुसार चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील मुक्ताईनगर बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत शिंदे गट आणि भाजप स्वतंत्र पॅनल तयार करून खडसेंना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. मुक्ताईनगरला उप बाजार समिती आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत माजी मंत्री सुरेश दादा जैन (Suresh Dada Jain) यांचेच वर्चस्व होते. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगाव बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपबरोबर पॅनल तयार करून महाविकास आघाडी पॅनलला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत महाविकास आघाडीचे पॅनल विरुद्ध शिंदे फडणवीस गटाचे पॅनल अशा लढती होणार आहे. सोमवार दिनांक ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून त्यानंतर २० एप्रिल ही तारीख उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे २० एप्रिल पर्यंत बाजार समिती निवडणुकीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात पॅनलमध्ये उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. २० एप्रिल नंतर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. दिनांक २८ एप्रिल रोजी मतदान होऊन ३० एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण एप्रिल महिना हा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मोठ्या धामधुमीचा असणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुका सत्ताधारी पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत या निवडणुकीमध्ये यशा अपयशावर त्यांचे आगामी भवितव्य अवलंबून राहणार आहे. बाजार समिती निवडणुकीत शिंदे फडणवीस यांना यश मिळाले तर इतर निवडणुका जसे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांसाठी बाजार समिती निवडणूक ही परीक्षाच म्हणता येईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.