बहिणीच्या नावाचा जाब विचारल्याने तरुणाला मारहाण; जबडा फ्रॅक्चर
जळगाव – एमआयडीसी परिसरात एका तरुणाला बहिणीचे नाव का घेतले, या कारणावरून तीन जणांनी मारहाण केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. या मारहाणीत तरुणाचा जबडा फ्रॅक्चर झाला असून, १५ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज जयपालसिंह चौधरी (२९, रा. रामेश्वर कॉलनी) हे मजुरीचे काम करतात. ९ मार्च रोजी त्यांच्याजवळ तीन जण आले व “तू आमच्या बहिणीचे नाव का घेतले?” असा जाब विचारला. चौधरी यांनी आपण कोणत्याही बहिणीला ओळखत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावर तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये एका आरोपीने बुक्का मारल्याने त्यांचा उजव्या जबड्याला फ्रॅक्चर झाले. तसेच, पुन्हा बहिणीचे नाव घेतल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पंकज चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करत आहेत.


