चिखल लोटल्याच्या कारणावरून दोन तरुणांना मारहाण ; एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर असलेल्या समर्थ नगरात केवळ घरासमोर चिखल लोटल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन एका कुटुंबाने दोन तरुणांना चापटाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली. या घटनेत दोन्ही तरुणांना जबर दुखापत झाली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरेश सुखदेव भुसारे (वय ४७, रा. समर्थ नगर, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयसमोर, जळगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१ ऑक्टोबर) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी सुमारे ४ वाजता ते पत्नी लताबाई यांच्यासह घरी होते. त्यांची मुले हेमंत आणि प्रशांत भुसारे हे फटाके घेऊन घरी आले असता समोर राहणाऱ्या सुनीताबाई सावंत या रस्त्यावरील चिखल भुसारे यांच्या घराकडे लोटत होत्या. याबाबत हेमंत भुसारे यांनी “आमच्या घराकडे चिखल लोटू नका” असे सांगितल्याने वाद निर्माण झाला.
त्याचा राग आल्याने सुनीताबाई सावंत यांचे पती प्रमोद सावंत आणि मुले भावेश प्रमोद सावंत व कल्पेश प्रमोद सावंत यांनी हेमंत आणि प्रशांत या दोघांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये कल्पेश सावंत याने लाकडी काठीने प्रशांतच्या डोक्यात प्रहार करून गंभीर दुखापत केली.
या प्रकरणी सुरेश भुसारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.