एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बैठकीत तुफान राडा !
गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेना (शिंदे) गट भिडले !
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यकर्त्यां आणि शिवसेना (शिंदे) गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात कार्यकर्ते एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकताना आणि गोंधळ घालताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद झाला. हा वाद एवढा वाढला की त्याचे रूप प्रत्यक्ष हाणामारीत परिवर्तित झाले. त्यामुळे बँकेच्या कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, शिवसेना (शिंदे) गटाचे नेते आणि एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलेला एसटी महामंडळाचा संप फसला. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल असंतोष निर्माण झाला असून अनेक सदस्य पुन्हा आमच्या युनियनमध्ये परतले आहेत.”
अडसूळ यांनी पुढे आरोप केला की, “एसटी बँकेत सदावर्ते यांच्या पॅनलने निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले. १२५ कर्मचाऱ्यांच्या भरतीत अनियमितता झाली असून, आमच्या संघटनेने या भरतीला स्थगिती आणली तरी त्यांनी ती प्रक्रिया सुरूच ठेवली. एवढंच नव्हे, बँकेसाठी १२ कोटींचं सॉफ्टवेअर थेट ५२ कोटींना खरेदी करण्यात आल्याचा गंभीर भ्रष्टाचार त्यांनी केला आहे.”
घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

