जळगावमध्ये तलवार-कुऱ्हाडसह दहशत; तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
जळगाव प्रतिनिधी ;– जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात बुधवारी (१६ एप्रिल) सकाळी सहाच्या सुमारास तलवार आणि कुऱ्हाड घेऊन दहशत निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये एकाला मारहाण करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्की मंगल कोळी (वय २६, रा. मंगळपूरी, रामेश्वर कॉलनी) हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. गोविंदा वामन आंबेकर (रा. कोरे नगर, मिल परिसर, धुळे) याने बुधवारी सकाळी विक्कीला शिवीगाळ करत जोरदार मारहाण केली.
त्याचबरोबर हातात तलवार व कुऱ्हाड घेऊन परिसरात आरडाओरड करत लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले आणि विक्कीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोविंदा आंबेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करत आहेत.