बांधकाम कारागिराला मारहाण करून १७ हजारांची रोकड लंपास; दोघांना अटक

0

बांधकाम कारागिराला मारहाण करून १७ हजारांची रोकड लंपास; दोघांना अटक

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील छत्रपती शिवाजी नगर ते सुरत रेल्वे गेट दरम्यानच्या भागात मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता एका बांधकाम कारागिराला मारहाण करून त्याच्याकडील १७ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ दोघांनाही अटक केली आहे.

रवींद्र बाबूलाल लुले (वय ४७, रा. राजमालती नगर, जळगाव) हे बांधकाम मजुर म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी ते पायी प्रवास करत असताना छत्रपती शिवाजी नगर आणि सुरत रेल्वे गेटच्या दरम्यान बौद्धविहारजवळ शेख हर्षद शेख हमीद (वय २६) आणि वसीम अली शहाबुद्दीन तेली (वय ३५, दोघेही रा. जळगाव) या दोघांनी त्यांना अडवले.

दोघांनी रवींद्र लुले यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील १७ हजार रुपये रोख जबरदस्तीने काढून नेले. घटनेनंतर रवींद्र लुले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तत्काळ कारवाई करत दोन्ही संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.