जळगाव: मोहाडी गावात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान लहान मुलांच्या भांडणातून वाद निर्माण झाला. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अनिल गिरजू गवळी (वय ४०) यांच्यावर दोन व्यक्तींनी हल्ला करून गंभीर मारहाण केली. त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी करण्यात आले.
ही घटना मंगळवार, दि. ११ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुशिल गुणवंत साठे आणि गुणवंत साठे (दोघेही रा. मोहाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अनिल गवळी हळदीच्या कार्यक्रमानंतर घरी जात असताना, तिथे सुरू असलेल्या लहान मुलांच्या भांडणात हस्तक्षेप करण्यासाठी गेले. मात्र, याचा राग आल्याने संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात गवळी गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील करत आहेत.


