धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. “मराठमोळं लेणं, आमचं लाखमोलाचं सोनं” या विषयावर आयोजित कार्यक्रमास साहित्यिक डॉ. सत्यजित साळवे यांचे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुणजी कुलकर्णी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदयजी जगताप व उपप्राचार्य डॉ. विजयानंद वारडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘सृजनधारा’ या भित्तीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या भित्तीपत्रिकेत विद्यार्थ्यांनी नामवंत कवींच्या निवडक कवितांचे हस्तलिखित स्वरूपात आकर्षक सादरीकरण केले होते.

विद्यार्थ्यांनी विविध कवींच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेचे सादरीकरण रीना पाटील हिने केले. सुरेश भट यांच्या ‘विजलो आज जरी मी’ या कवितेचे सादरीकरण सृष्टी कमोदे हिने केले. ‘आई माझी मायेचा सागर’ ही कविता गजानन पाटील यांनी सादर केली. तसेच बालकवी यांच्या ‘औदुंबर’ या कवितेचे सादरीकरण चंचल पाटील हिने केले.
प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना ‘अभिजात भाषा’ या संकल्पनेचे विवेचन केले. कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाचा संदर्भ देत त्यांनी नातेसंबंधातील भावबंध समजून घेण्यासाठी हे नाटक विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहावे, असे आवाहन केले. मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रमुख वक्ते डॉ. सत्यजित साळवे यांनी मराठी भाषेवर आईसारखे प्रेम करण्याचे आवाहन केले. मराठी भाषा जिवंत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी मराठीतील ५२ बोलीभाषांमुळे भाषा अधिक समृद्ध झाल्याचे नमूद केले. साहित्य हा समाजाचा आरसा असून समाजात घडणाऱ्या घटना साहित्यातून प्रतिबिंबित होतात, असे त्यांनी स्पष्ट केले. शब्दांमध्ये भावना व संवेदनांचा स्पर्श असतो, याचे प्रभावी विवेचन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अरुणजी कुलकर्णी यांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले. बोलीभाषेचे संवर्धन करणे तसेच मराठी भाषा व मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ. स्वप्नील खरे लिखित ‘इंद्रधनुष्य’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. कांचन महाजन, डॉ. संजय शिंगाणे, डॉ. एस. एम. खरे, प्रा. एस. व्ही. पाटील, प्रा. आर. एम. केंद्रे, डॉ. दीपक बोंडे, डॉ. श्रीपाद उपासनी, डॉ. हर्षवर्धन भालेराव, प्रा. संदीप पालखे, डॉ. एस. एच. वाघमारे, प्रा. एस. एच. देसले, प्रा. मोहन आर. लहासे, प्रा. प्रशांत क्षेत्रीय, प्रा. सुनील पाटील, डॉ. ज्योती महाजन, प्रा. सुलताना पटेल, प्रा. अर्चना पाटील, प्रा. स्नेहा बिचवे, प्रा. जयश्री धनगर, प्रा. सुप्रेश पगारे, प्रा. अमित पाटील, डॉ. धममज्योत गायकवाड, डॉ. गजानन जाधव, गजानन माळी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. नेत्रा उपाध्ये-जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.