मराठी भाषा ‘अभिजातच’ : प्रा. शरच्चन्द्र छापेकर
मू. जे. महाविद्यालयात 'लाभले आम्हास भाग्य' या अभिजात मराठी भाषेच्या गौरव सोहळ्याप्रसंगी गौरवोद्गार
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी भाषेचा इतिहास समृद्ध आहे. मराठी भाषेत मध्ययुगीन काळापासून निर्माण झालेले साहित्य अभिजात स्वरूपाचे आहे. त्यामुळे ही भाषा अभिजात आहे. त्यावर आता केवळ शिक्कामोर्तब झाले आहे. असे मत प्रा. शरच्चन्द्र छापेकर यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या निमित्ताने, मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभाग आणि जळगाव येथील साहित्य भारती या साहित्य संस्थेच्या वतीने ‘लाभले आम्हास भाग्य’ या अभिजात मराठी भाषेच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मराठी भाषेची श्रेष्ठता, मराठी साहित्यातील समृद्धता, मराठी भाषेची संपन्नता, अभिजात दर्जा मिळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी, होणारे फायदे, मराठी साहित्याला समृद्ध करणारे संतांचे अनमोल विचार, विविध साहित्यिकांनी केलेला मराठी भाषेचा गौरव याविषयी प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी मार्गदर्शन केले. मराठी भाषा अधिक काळ टिकविण्याची आणि वाढविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य विद्याशाखेचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठी ही व्यवहार भाषा आहेच परंतु ती ज्ञानभाषा होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जगातील अनेक भाषांमधील शब्द स्वीकारून भाषा अधिकाधिक समृद्ध होते. मराठी भाषिक म्हणून आपण मराठीमधून लेखन, संभाषण, साहित्य निर्मिती केली पाहिजे. ती आपली जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वि. म. कुलकर्णी यांची ‘माझ्या मराठीची गोडी’ या कवितेचे सामुहिक गायन विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाला खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, साहित्य भारतीचे शहराध्यक्ष डॉ. सुभाष महाले, डॉ. योगेश महाले, डॉ. भाग्यश्री भलवतकर, डॉ. अखिलेश शर्मा, डॉ. विजय लोहार, डॉ. विलास धनवे, डॉ. अतुल पाटील, प्रा गोपीचंद धनगर, प्रा. रेणुका झांबरे तसेच इतर प्राध्यापक, श्रोते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले.