“मराठीत बोला” म्हणत महिलांवर हल्ला
डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार, बाळाचीही आबाळ
डोंबिवली वृत्तसंस्था डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागात मंगळवारी सकाळी घडलेला एक प्रकार आता शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. “मराठीत बोला” या कारणावरून एका महिलेसह तिच्या सहकाऱ्यावर आणि नऊ महिन्यांच्या बाळासमोरच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा एका महिला दुचाकीस्वाराने आपल्या सोसायटीच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सोसायटीच्या प्रवेशव्दारावर उभ्या असलेल्या एका तरुणाला “एक्सक्युज मी” असे म्हणत बाजू व्हावे, अशी विनंती करण्यात आली. मात्र, या विनंतीवर तरुणाने “मराठीतून बोला!” असा संतप्त सूर लावत महिलांवर दबाव आणायला सुरुवात केली.
महिलांनी इंग्रजी किंवा हिंदीत संवाद केल्याचे पाहून संबंधित तरुणाने हात धरणे आणि धमकावणे सुरू केले. विशेष म्हणजे दुचाकीच्या मागील सीटवर बसलेली महिला नऊ महिन्याचे बाळ घेऊन होती, तरीही त्या तरुणाने कोणतीही संवेदनशीलता न दाखवता तिचा हात पिरगटत “मराठीत का बोलत नाहीस?” असा सवाल करत असभ्य वर्तन केलं.
याच घटनेत पुढे त्या तरुणाच्या घरातील चार-पाच महिला आणि तीन तरुणांनी एकत्र येऊन, दोन्ही महिलांना सोसायटीच्या आवारातच बेधुंद मारहाण केली. या संपूर्ण गोंधळात त्या बाळाचीही जबरदस्त आबाळ झाली, पण हल्लेखोरांनी त्याची कसलाही विचार केला नाही.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.