गोकुळ कोळी
मनवेल ता. यावल
मनवेल ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपून सात महिने उलटले असून, ८ सप्टेंबर २०२६ रोजी यावल पंचायत समितीतील ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, नियुक्तीनंतरच्या ३४ दिवसांत प्रशासकांनी केवळ दोन दिवस ग्रामपंचायतीला भेट दिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार नेमका कोणाच्या भरवशावर सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून गावातील प्रशासकीय कामकाजाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मनवेल ग्रामपंचायतीचा नियमित कार्यकाळ १४ फेब्रुवारी २०२६ रोजी संपला. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होईपर्यंत प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. मनवेल येथेही प्रशासक नियुक्त करण्यात आले असले, तरी त्यांच्या अपुऱ्या उपस्थितीमुळे प्रत्यक्ष कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प होण्याच्या मार्गावर?
गेल्या ३४ दिवसांपासून गावातील विविध कामांचा खोळंबा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्यातच मनवेल येथे कार्यरत ग्रामसेवकाकडे तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांनाही कामकाज सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी, गावातील मूलभूत प्रश्न आणि विविध प्रशासकीय कामे प्रलंबित राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दाखल्यांसाठी ग्रामस्थांची धावपळ
रहिवासी दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीत वारंवार चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासकांची नियुक्ती होऊनही ते नियमितपणे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासकांची नियुक्ती नेमकी नागरिकांच्या सोयीसाठी की केवळ कागदोपत्री, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजकीय पार्श्वभूमीमुळे प्रशासनाची उदासीनता?
मनवेलची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता प्रशासन गावाकडे दुर्लक्ष करीत आहे का, अशी चर्चाही ग्रामस्थांमध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. गावातील प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासाठी प्रशासकांनी नियमित उपस्थित राहावे आणि प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आता संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

