मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क
साकळी येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय महिलेचे आपल्या एका नातेवाईकाकडे जळगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना दि.३ रोजी मध्यरात्री घडली असून या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद तैय्यब सय्यद ताहेर यांच्या पत्नी शबाना बी सय्यद तैय्यब या दि. २ रोजी आपल्या मुलीच्या भेटीसाठी जळगाव येथे गेलेल्या होत्या. दरम्यान त्यांनी संध्याकाळचे जेवण केल्यानंतर आपली मुलगी, जावई, नातवंडे यांच्याशी अगदी गोड-कौतुकाने गप्पागोष्टी गेल्या. त्यानंतर त्या झोपी गेल्या. नियतीने आपल्या नशिबात काय लिहून ठेवले आहे हे कुणालाही माहित नसते. शबाना बी यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, पुढच्या काही तासात आपल्या जीवाचे बरे वाईट होईल.अचानक काळच त्यांच्यावर उलटला. दरम्यान मध्यरात्री दीड ते दोन वाजता शबानाबी यांची तब्येत अचानक बिघडली त्यांच्या छातीत दुखू लागले.
लागलीच नातेवाईकांनी त्यांना गावातील खाजगी दवाखान्यांमध्ये नेले असताना वैद्यकीय तपासणीनंतर मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालावलेली होती. शबाना बी यांच्या अचानक निधन झाल्याची बातमी साकळी येथे आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीय तसेच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्या अतिशय सुस्वभावी, कुटुंबवल्सल व आदर्श गृहिणी होत्या. त्यांचा मृतदेह साकळी येथे आणून दि.३ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान यथील दफनभुमीत त्यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत शबाना बी यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद तय्यब सय्यद ताहेर यांच्या पत्नी तर माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद अश्फाक सय्यद शौकत यांच्या काकू तसेच सय्यद आझाद व सय्यद शहजाद यांच्या मातोश्री होत.