नवी दिल्ली: – भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशभरात यंदा मान्सूनदरम्यान सामान्यपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज सोमवारी व्यक्त केला. नैऋत्य मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. पुढच्या पाच दिवसांत केरळात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल. मान्सूनच्या आगमनाबरोबर उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. . मान्सून ३१ मेपर्यंत केरळात धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केला होता.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाची दीर्घकालीन सरासरी १०६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी, वायव्य भागात सामान्य, देशाच्या मध्य व दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी डिजिटल माध्यमातून माध्यमांशी संबोधित करताना दिली.