मतमोजणी केंद्र, स्ट्राँग रूमची अधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम व प्रशिक्षण हॉलची पाहणी केली. यावेळी मतमोजणीचे टेबल कसे लावले जातील, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह मतमोजणी अधिकाऱ्यांची आसन व्यवस्था कशी असेल याची माहिती शहर अभियंता यांनी यावेळी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम सिलींग, सेटींगपासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व व्यवस्था कशी असेल, याची पाहणी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरीक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियंता योगेश बोरोले, आर. टी. पाटील, निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, महेश चौधरी, निवृत्ती गायकवाड, श्रीमती घाटगे यांनी शुक्रवारी दुपारी केली. महापालिकेची मतमोजणी एमआयडीसीमधी वखार मंडळाच्या गोडावून मध्ये होणार आहे. तेथून मशिन सिलींग सेंटींगपासून ते मतमोजणी होईपर्यंत कशी यंत्रणा काम करेल याचा सर्व आढावा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी घेतला.
यासंदर्भात प्लॅन तयार करण्यात आला असून त्या नकाशाच्या माध्यमातून आसन व्यवस्था, मतमोजणीचे टेबल कुठे असतील या सर्वांनी माहिती समजून घेतली. तसेच निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या ३५०० कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे संभाजीराजे नाट्यगृहाची देखील पाहणी अधिकाऱ्यांनी केली.