महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नियोजन शून्य कारभार ; नागरिकांना नाहक मनस्ताप
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील नियोजनशून्य कारभार आणि तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. संगणक आणि मनुष्यबळ उपलब्ध असूनही दाखले वितरणात होत असलेली दिरंगाई, विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक वेळा दिवसभर रांगेत थांबूनही दाखले न मिळाल्याने नागरिक निराश होऊन परतत आहेत.
एकाच संगणकावर चालते काम
विभागात दोन संगणक उपलब्ध असूनही प्रत्यक्षात केवळ एकाच संगणकावरून दाखल्यांचे वितरण सुरू आहे. त्यामुळे कामाचा वेग मंदावतो, रांगा वाढतात आणि नागरिकांचा तासन्तास वेळ वाया जातो. शाळा, महाविद्यालये तसेच आधारकार्ड अपडेटसाठी आवश्यक असलेल्या क्यूआर कोडयुक्त जन्मदाखल्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, मात्र विभागाकडून योग्य नियोजन न केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
टोकन पद्धतीचा त्रास
या विभागात दाखले वितरणासाठी सकाळी ११ वाजेपर्यंतच वेळ निश्चित आहे. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान नागरिकांना टोकन वाटले जातात. त्या टोकनधारकांनाच दिवसभरात दाखले मिळतात. मात्र, ११ नंतर दाखला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना टोकनच दिले जात नाही. अशा नागरिकांना “उद्या या” असे सांगून माघारी पाठवले जाते. परिणामी, बाहेरगावाहून आलेल्यांना पुन्हा चकरा माराव्या लागत आहेत.
नागरिकांचा संताप
या“संगणक प्रणाली असताना एवढा विलंब का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. विभागात पुरेसे मनुष्यबळ आणि साधनसामग्री असूनही निष्काळजीपणा व ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

