
लोकशाही न्यूज नेटवर्क
गेले चार दिवस मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या होत्या त्या शासनाने मान्य केल्याने आज चौथ्या दिवशी मराठा समाज आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्वात समिती सदस्यांनी आझाद मैदानावर जरंगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि ज्या काही जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या त्या मान्य करून तातडीने जीआर काढण्यात आला. त्यामुळे आझाद मैदानावरील जरांगे पाटील यांचे उपोषण आज चौथ्या दिवशी सुटले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “तुमचं आमचं वैर आता संपलं..!” सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी अशी गर्जना करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. मराठा समाजाला सरसकट आंदोलन हे कोर्टाच्या कचाट्यामुळे शक्य नाही. ती मागणी ओढून धरली तर पुन्हा कोर्टबाजी होईल, हायकोर्ट सुप्रीम कोर्टात प्रकरण पेंडिंग राहील. त्यामुळे हैदराबाद गॅजेटिया मान्य करून त्यात ज्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. कुणबी प्रमाणपत्र मिळाले की ओबीसी आरक्षण मिळेल. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे सरकून सरसकटचा आग्रह सोडून दिला.
ही अत्यंत चांगली बाब असून मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण मुंबईकरांना जे वेठीस धरले होते, त्यामुळे मुंबईकरांची नाराजी मराठा समाज आंदोलकांविषयी निर्माण झाली होती ती नाराजी आणखी वाढण्याआधीच आज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याने पुढचा अनर्थ टळला. चार महिन्यांपूर्वी आझाद मैदानावर मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करण्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली होती. त्यानुसार गेले चार दिवस आझाद मैदानावर ते आंदोलन चालले. दरम्यान हजारो मराठा बांधव मुंबईच्या आंदोलनात सहभागी झाल्याने आझाद मैदाना व्यतिरिक्त मुंबई, सीएसटी रेल्वे स्टेशन तसेच मरीन ड्राईव्हवर आंदोलकांचा ठिया होता. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होत असल्याने जणूकाही आंदोलकांनी मुंबईकरांना वेठीस धरले असल्याने मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागले..
मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावरच आंदोलन करावे, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या होत्या आणि हे आंदोलन आझाद मैदानावर शांततेत करावे असेही कोर्टाने सुचित केले होते. त्यामुळे आंदोलनाचा अतिउत्साह नडला. कोर्टाच्या आदेशाचे आंदोलकांनी पूर्णपणे तंतोतंत पालन करावे, असे वारंवार जरांगे पाटलांनी सांगून सुद्धा उत्साही आंदोलकांकडून त्याचे पालन केले गेले नाही. रस्त्यावरच्या गाड्या अडविणे, रस्त्यावर उघडे अंघोळ करणे, सीएसटी रेल्वे स्टेशन वरील रुळावर नाचणे, घोषणाबाजी करणे यामुळे आंदोलनाला हुल्लडबाजीचे स्वरूप प्राप्त झाले. विशेष म्हणजे हायकोर्टात जाऊन घोषणाबाजी करणे, न्यायमूर्तींच्या गाड्या अडविणे या प्रकाराचा हायकोर्टाने एक गंभीर दखल घेऊन आझाद मैदाना व्यतिरिक्त मुंबईतील इतरत्र असलेल्या आंदोलकांना शासनाने मुंबई बाहेर काढावे, ग्रामीण भागातून येणाऱ्या आंदोलकांचा ठाणे येथे अटकाव करावा अशा पोलिसांना सूचना दिल्या. या प्रकारामुळे हायकोर्टाचे ताशेरे ओढल्याने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा अपमान झाला, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच मरून मनोज जरांगे जिंकले पण आंदोलकांवर कोर्टाने ताशेरे ओढल्याने मराठा समाजाचे आंदोलन बदनाम झाले, असेच म्हणावे लागेल. मनोज जरांगे पाटलांनी हायकोर्टाच्या ताशेऱ्यांची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे..!

