अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांसाठीची पिकविमा योजना बंद करायची कोणताही विचार नाही असे सांगताना या पिकविमा योजनेचे गुणगाण करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तोल सुटला. त्याभरात कोकाटे यांनी आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. पण एक रुपयात पिकविमा योजना मिळते असे बोलून गेले. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी तर माणिकराव कोकाटे यांच्यावर तोंड सुख घेतलेच परंतू सरकारमधील सहकारी पक्ष भाजपाने देखील माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे.
अमरावतीत पत्रकारांशी बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकरी पिक विमा योजनेचे गुणगाण करताना भलतेच बोलून गेले. त्यांनी यावेळी भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. पण शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना आम्ही देत आहोत अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आणि वादंग उठले. पिकविमा योजनेची भलामण करताना ते म्हणाले की पिक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजेत. योग्य त्या शेतकऱ्याला तिचा लाभ मिळाला पाहिजे. यातले फायदे तोटे हे चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहे. सरकारला पिक विमा बंद करायची नाही. परंतु या योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावे लागतील असे कोकाटे म्हणाले.
पिकविमा योजनेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी जो काही निर्णय घेऊ तो दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलून घेतला जाईल असे सांगताना कृषीमंत्र्यांनी विचार केला तर भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही मात्र एक रुपयांमध्ये पिक विमा दिला असे म्हटले आणि अडचणीत आले. या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. बाकी राज्यातील लोकांनी देखील ऑनलाईन अर्ज केले होते.
दरम्यान माणिकराव कोकाटे सारख्या जबाबदार मंत्र्यांनी अशी विधानं करताना सावधता बाळगावी हवी होती. वक्तव्याचा विपर्यास होणार नाही याची काळजी घ्यावी , त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता असंही दिसतंय असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी बाजू सावरताना म्हटले आहे.