मंगरुळएमआयडीसीतून जप्त केले रेशनचे धान्य

0

 

९ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसीमध्ये रेशनचा गहू, तांदूळ खरेदी करून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून ट्रकसह तांदूळ, गव्हाच्या गोण्या असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

मंगरूळ येथील एमआयडीसीतील लक्ष्मी फूड प्रोसेसरमध्ये व्यापारी अथर्व प्रदीप डेरे (वय २२) हा रेशनचा तांदूळ आणि गहू खरेदी करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, प्रकाश चव्हाण, भटूसिंग तोमर, प्रमोद बागडे यांना बोलावून छापा टाकण्यास सांगितले. २८ रोजी दुपारी पोलिसांनी धाड टाकली.

ट्रकमधून गोण्या उतरवताना दिसून आल्याने पुरवठा निरीक्षक संतोष बावणे यांना पंचनाम्यासाठी बोलावण्यात आले… त्यावेळी गाडीमध्ये ३ लाख ९४ हजार रुपये किमतीच्या १९७ गोण्या आढळून आल्या. त्यावर छत्तीसगड राज्य सहकारी विपणन संघ, तर ४५ हजार रुपये किमतीच्या ४५ गोण्यांवर मध्य प्रदेश स्टेट सिव्हिल सप्लाईज कार्पोरेशन असे नाव व लोगो छापलेले दिसून आले. या गोण्या आणि ५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ९ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भटूसिंग तोमर यांच्या फिर्यादीवरून अथर्व प्रदीप डेरे (वय २२ रा. पवन चौक, अमळनेर) व किशोर वासुदेव पाटील (वय ४२, रा. मजरेहोळ, ता. चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.