थर्टी फर्स्टच्या रात्री दुधाची पार्टी..!

0

लोकशाही संपादकीय लेख

३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जल्लोष (New Year) केला जातो. त्या दिवशी मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल उघडे ठेवले जातात. अलीकडे थर्टी फर्स्टला तरुणांकडून मद्य प्राशन करून हिंदी मराठी ठसकेबाज डीजे गाण्यांवर मदहोशपणे डान्स केला जातो. खाण्यासाठी नॉनव्हेज, चायनीज आदींची रेलचेल असते. तरुणांमध्ये जणू ही फॅशन झाली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि मद्य पार्टी हे ठरलेले समीकरण असते. परंतु ३१ डिसेंबरला ‘दुधाची पार्टी’ होऊ शकते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु चाळीसगावचे (Chalisgaon) तरुण आ. मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी चक्क दुधाची पार्टी आयोजित करून सर्वांनाच चकित केले. ३१ डिसेंबर २०२२ च्या रात्री आ. मंगेश चव्हाण यांनी आपल्या टाकळी प्र. या गावी रात्री दुधाची पार्टी आयोजित करून संपूर्ण गावाला तसेच तरुणाईला आमंत्रण निमंत्रण देऊन दुधाची पार्टी केली. या दूध पार्टीचे पार्टीने एक आगळावेगळा पायंडा आ. मंगेश चव्हाण यांनी पाडला.

आ. मंगेश चव्हाण हे भाजप तर्फे (BJP) चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यापासून सर्वत्र चर्चेत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आ. म्हणून निवडून आले तेव्हा अडीच वर्ष महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार होते. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांना घेऊन चक्क जळगावच्या अधीक्षक मंडळाच्या कार्यालयात चालून गेले. तेथे अधीक्षक अभियंत्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत म्हणून अधीक्षक अभियंत्यांला खुर्चीला दोरखंडाने बांधून ठेवले. त्यात शेतकऱ्यांसह आ. मंगेश चव्हाण यांचावरही गुन्हे दाखल झाले. तब्बल दहा दिवस जेलची हवा खाल्ली. “शेतकऱ्यांसाठी जेलच काय मरणही पत्करायला तयार आहे,” असे जाहीर वक्तव्य करून त्यांनी आपला ताठ बाणा दाखवून दिला.

दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) कोसळले आणि शिंदे भाजपचे सरकार (Shinde BJP Govt) स्थापन झाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना सुद्धा आरटीओच्या हप्तेबाजीबाबत आवाज उठवला आणि त्यांचे स्टिंग ऑपरेशन केले. हे प्रकरण गाजले. ट्रक ड्रायव्हरकडून दिले जाणारे हप्ते थांबले की नाही हे माहीत नाही, परंतु ट्रक ड्रायव्हरची सहानुभूती मात्र मोठ्या प्रमाणात आ. मंगेश चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर लोकप्रतिनिधींवर शासकीय अधिकाऱ्यांची कुरघोडी पैसे घेतल्याशिवाय अधिकारी कामेच करीत नाही, असा जाहीर आरोप जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केला. जळगाव जिल्ह्यासह दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon Jilha Dudh Sangh) प्रशासकीय मंडळावर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि अवघ्या ३८ दिवसांच्या प्रशासकीय कालावधीत दूध संघात लोणी आणि तुपात झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. कार्यकारी सहसंचालकांसह काही अधिकाऱ्यांना जेलची हवा खावी लागली.

त्यानंतर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आ. मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) आरोपाच्या फैरी झाडल्या. दूध संघ निवडणुकीत मुक्ताईनगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्या विरोधात निवडणूक लढवून मंदाकिनी खडसे यांना पराभूत केले. जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या प्रचारात आ. मंगेश चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि शिंदे फडणवीस गटात शेतकरी विकास पॅनलला बहुमत प्राप्त झाले. त्याचीच पावती म्हणून आ. मंगेश चव्हाण यांची जिल्हा दूध संघाच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. एकंदरीत अगदी कमी कालावधीत मंगेश चव्हाण यांनी आपली लोकप्रियता दाखवून दिली.

३१ डिसेंबर रोजी दुधाची पार्टी आयोजित करून आपले वेगळेपण आ. मंगेश चव्हाण यांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे दूध संघाचे चेअरमन या नात्याने दुधाचा प्रचार आणि प्रसार करण्याचेच जणू कार्य त्यांनी केले. “‘द’ दारूचा नव्हे… तर, ‘द’ दुधाचा…” हे आ. चव्हाण यांचे आगळे वेगळे स्लोगन सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. सोशल मीडियावर हे स्लोगन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. “आपण व्यसनमुक्त असू तरच इतरांना सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे..” असे मंगेश चव्हाण यांचे वक्तव्य इतरांसाठी आदर्शवत म्हणता येईल. ३१ च्या रात्री दुधाची पार्टी आयोजित करून तरुणांसाठी व्यसनमुक्तीचा संदेश देणे ही महत्त्वाची बाब आहे. दुधाची पार्टी आयोजित करून अथवा दुधाचे सेवन करून शेतकऱ्यांसाठी दुधाच्या शेतीखर्च व्यवस्थेला चालना द्या, असा संदेश देऊन दूध संघाच्या चेअरमन पदाला साजेसे असे वक्तव्य करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जणू प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतो.

याचा अर्थ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विकासासाठी हा त्यांचा एक अनोखा प्रयोग म्हणता येईल. त्यांच्या उपक्रमाला तरुणाईसह अबाल वृद्धांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. थर्टी फर्स्टच्या पार्टीच्या बहाण्याने विशेषतः तरुण पिढी ओल्या पार्टीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेकडे जात असताना त्यांना दुधाचे व्यसन लावणे फार मोठे अवघड कार्य आहे. परंतु मंगेश चव्हाण यांनी हे हाती घेऊन एक वेगळा संदेश दिला, हे महत्त्वाचे आहे.

वर्षाची सुरुवात धुंदीत नाही तर शुद्धीत व्हावी, हा या दूध पार्टीचा उद्देश त्यांनी सांगितला. तरुण आ. मंगेश चव्हाण यांच्यावर अपरिपक्वतेचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केले जात असला, तरी अनुभवातून त्यांची पावले परिपक्वतेकडे पडत आहेत, हेच “‘द’ दारूचा नव्हे… तर, ‘द’ दुधाचा…” या त्यांच्या स्लोगनने सिद्ध होते. आ. मंगेश चव्हाण आणखी परिपक्व व्हावेत याच त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा….!

Leave A Reply

Your email address will not be published.