ग्राम विकास अधिकारी साहेब…सांगा या रस्त्यावरून आम्ही कसे वापरावे?
साकळी येथील जुने पोस्ट ऑफिस भागातील दोघं धाप्यांची दुरावस्था
लोकशाही न्युज नेटवर्क
मनवेल ता.यावल, साकळी येथील जुन्या पोस्ट ऑफिस भागातील गटारीवरील दोन ठिकाणचे धापे पूर्णपणे तुटलेले व खचलेले असून हे धापे या भागातील नागरिकांच्या वापरासाठी अतिशय धोकेदायक व त्रासदायक बनले आहे.या धाप्यावरून वाहनाने वापरणे सोडा तर सोडाच पायी चालणेही कठीण व जिवघेणे बनले आहे. या ठिकाणाहून वापरताना रात्रीच्या वेळी अनेक नागरिक पडतही आहे. या धाप्यावरील वापराचा त्रास पाहता नागरिकांच्या तोंडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. “ग्रामविकास अधिकारी साहेब… सांगा हा रस्ता आम्ही कसा वापरावा? एवढी बिकट अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे. तरी सदर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देऊन या भागातील धापे नव्याने बनवण्यात यावे अशी मागणी या भागातील रहिवासी करीत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुने पोस्ट ऑफिस भागातून जाणारा रस्ता हा कुंभारवाडा, हनुमान पेठ या भागातील नागरिकांच्या वापराचा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याने महिला-पुरुष, शालेय विद्यार्थी, अबालवृद्ध तसेच ग्रामंस्थांची या सर्वांची नेहमी वर्दळ असते. दरम्यानचे या रस्त्यावरील डॉ.मकरंद नेवे यांच्या जवळील गटारीवरील धापा पूर्णपणे खराब झालेला असून हा धापा नागरिकांच्या वापरासाठी अयोग्य,जिवघेणा व डोकेदुखी बनलेला आहे. धाप्यांवर मधोमध खड्डे पडलेले असून या धाप्यांची पूर्णपणे पडझड झालेली आहे.त्याचप्रमाणे याच रस्त्यावरील कुंभार वाड्यालगत लक्ष्मण कुंभार यांच्या घराजवळील गटारीवरील दुसरा एक धापा हा सुद्धा पूर्णपणे खचला आहे व नागरिकांच्या वापरासाठी धोकेदायक बनलेला आहे.
धाप्यांचे लवकरात- लवकर नव्याने बांधकाम करण्यात यावे मागणी ग्रामस्थ करीत आहे. याबाबतचे लेखी निवेदन सदर भागातील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे.