लोकशाही न्यूज नेटवर्क
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीच्या निजामपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सलामत अली अंसारीला अटक केली आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. आरोपी मृत मुलीच्या शेजारी राहत होता.
७ वर्षांची मुलगी रविवारी दुपारी ३ वाजता शौचासाठी घराबाहेर पडली होती. पण ती घरी परत आलीच नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी तिचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर संध्याकाळी मुलीच्या आई-वडिलांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या घराला टाळे पाहिले. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना त्याच्या घरामध्ये शौचाला जाण्यासाठी मुलगी घेऊन गेलेली बादली दिसली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी घराचा टाळा तोडला आणि आतमध्ये घुसले.
शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या घरात एका गोणीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
या आधीही केलाय गुन्हा..!
आरोपी सलमानत अली अंसारीने हा दुसरा गुन्हा केला आहे. याआधी त्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. २० सप्टेंबर २०२३ ला बिहारमधून त्याला अटक करण्यात आली होती. तो ठाण्यातील तुरुंगात शिक्षा भोगत होता. ४ ऑगस्ट २०२४ ला सुनावणीदरम्यान पोलिसांना चकवा देत तो कोर्टातून पळून गेला होता. त्यानंतर तो भिवंडी परिसरात लपून बसला होता. त्याठिकाणी शेजारी राहणाऱ्या ७ वर्षांच्या मुलीवर त्याने बलात्कार करून तिची हत्या केली. या मुलीला त्याने आमिष दाखवत घरामध्ये बोलून घेतले आहे तिच्यासोबत भयंकर कृत्य केले.