आता कामाचे बोला..!

0

मन की बात

लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आरो-प्रत्यारोपाचे धुराळे देखील थंडावले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातून भाजपा महायुतीला भरघोस यश प्राप्त झाले असून दोन खासदार, अकरा आमदार महायुतीचे आहेत. जळगाव जिल्हा तसा भाजपाचा बालेकिल्ला म्हणूनच परिचित आहेत. मतदारांनी महायुतीवर विश्वास ठेवून त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. केंद्रात रक्षा खडसे यांच्या रुपाने एक राज्यमंत्री पद तर राज्यात फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्याला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व संजय सावकारे यांच्या रुपाने कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. ऐवढा सारा मंत्रिपदांचा गोतावळा तयार झाला असून स्वाभाविकच जिल्हावासियांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे. नैसर्गिक साधन संपत्तीने जळगाव जिल्हा ओतप्रोत संपन्न असला तरी सिंचनाची योग्य सुविधा नसल्याने बहुतांश भाग दुष्काळाच्या छायेतच असतो. सातपुड्याच्या पायथ्याचा भाग सोडला तर जिल्ह्यात बागायती शेती बोटावर मोजण्या इतक्याच भागात केली जाते. सोने, कापूस, केळी, चटई , डाळ या प्रमुख गोष्टींसाठी जळगाव जिल्हा ओळखला जात असला तरी या वस्तूंवर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प जिल्ह्यात नसणे दुर्दैवच म्हणावे लागेल.

 

सुर्वणनगरी असा बिरुद असलेल्या जिल्ह्यात मात्र सोन्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभाण्यात आलेला नाही. केळी, कापूस पिकांबद्दल सरकारची सातत्याने उदासिनता दिसून येते. केळीसाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा झाली मात्र ती घोषणाच ठरली आहे. अस्तित्वात नसलेल्या केळी महामंडळाला गतकाळात शंभर कोटींचा निधी देण्याची घोषणा देखील करण्यात आली मात्र प्रत्यक्षात हाती धुपाटणेच आले. कापसावर प्रक्रिया करण्यासाठी टेक्सस्टार्इल प्रकल्प उभारण्याची घोषणा कितीतरी वेळा झाली मात्र त्याचा श्रीगणेशा झालाच नाही. चटई उद्योगाला बुस्टर डोस देण्याची गरज असतांनाही त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. जळगाव शहरातील एमआयडीसीचा प्रश्न कधीपासून थंडबस्त्यात आहे, वाढीव एमआयडीसी मंजूर होवूनही तेथे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. बेरोजगारीवर मात करण्यासाठी या उद्योग-धंद्यांना गती देणे अपेक्षित असतांनाही लोकप्रतिनिधी याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. ‘लाडके’ सरकार अस्तित्वात आले असतांनाही जळगाव जिल्ह्याला मात्र ‘सावत्र’ वागणूक दिली जात आहे.कििकती तरी सरकार आले नी गेले तरी प्रश्न तसेच पडून आहेत.

जिल्ह्यातील बेरोजगार तरुण गाव सोडून जात आहेत. लोकप्रतिनिधींना हे तरुण केवळ निवडणुकीच्या काळात आठवतात मात्र त्यांच्या हाताला काम देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. आपल्या बाजूला असलेल्या नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर यांचा विकास आपल्या डोळ्यात अंजन घालत असतांनाही आपण केवळ निधीच्या नावानेच ‘बोटे’ मोडीत बसलो आहोत. ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असले तरी आता जिल्हावासियांच्या अपेक्षा आणि महत्वाकांक्षा वाढल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. एक केंद्रीय राज्यमंत्री अन्‌ तीन राज्य कॅबिनेटमंत्री जिल्ह्यात असल्याने जिल्ह्याच्या विकासाची गंगा घरोघरी पोहचणे अपेक्षित आहे. विकासासाठी लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करणे अपेक्षित आहे.

 

दीपक कुलकर्णी

वरिष्ठ उपसंपादक

9960210311

Leave A Reply

Your email address will not be published.