दिवाळी… निवडणूक अन्‌ टीकाबॉम्ब

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

नोव्हेंबर महिन्यात सुरु होणारी थंडी अद्यापपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात सुरु झालेली नाही. तशातच राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. दिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला दिवस कडाक्याच्या थंडीचा असायचा. पंचवीस – तीस वर्षांपूर्वी प्रचंड पडलेली कडाक्याची थंडी या अशा थंडीच्या वातावरणातील अभ्यंगस्थान आणि तुळशी वृंदावनासमोर निरांजनाच्या मंद ज्योतीच्या साक्षीने गरमा-गरम कांदा-पोहे आणि आई, वहिणी, बहिणींच्या हातचा घरगुती लाडू, चिवडा, चकली, करंजी असा सकाळच्या प्रहरी नाश्ता करुनच दिवाळी सणाचा शुभारंभ व्हायचा. आजही यात फार बदल घडला असे नाही; परंतु अलिकडे तयार मिळणारा फराळ बाजारात जागो-जागी उपलब्ध असतो; परंतु घरात आई-बहिणींच्या हातच्या फराळाची चव कशाला येऊच शकत नाही.

ऐन दिवाळीत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच ‘दिवाळी’ होत असली तरी उमेदवारांचे मात्र ‘दिवाळे’ निघत आहे. राज्य विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होवू घातले असून प्रशासकीय यंत्रणेपासून राजकीय पुढाऱ्यांची लगीनघार्इ आहे. उमेदवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून प्रत्येक उमेदवार हात जोडून ‘लक्ष’ ठेवण्याची विनंती करीत हिंडत आहे. बरेच प्रयत्न करुनही या ‘लोकप्रतिनिधीं’चे दर्शन होत नाही ते आज गल्लोगल्ली हिंडत आहेत. ए.सी गाड्यांमध्ये काचा वरती करुन हिंडणारे हे पुढारी आज घाम पुरत चक्क पायपीट करीत तुमच्या घरापर्यंत आले आहेत. तेही फक्त तुमच्या-आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी ?

या वर्षीची दिवाळी ही महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या वातावरणातच होत आहे. दिवाळीच्या या पंधरवड्यातच राज्यातील निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुका दिवाळीत होत असल्याने निवडणूक प्रचार करणाऱ्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनाही अतिशय आनंदी, उत्साही वातावरणात निवडणूक प्रचारही होताना दिसतो. जिल्ह्यातील मतदारसंघांत चौरंगी, तिरंगी, पंचरंगी लढत होत आहे. यामुळे साहजिकच निवडणुकीतील वातावरण ढवळून निघत आहे. खरंतर कोणत्याही निवडणुका या विकासाच्या मुद्यावर लढवल्या गेल्या पाहिजेत. आपल्या सत्ता काळात कोणती विकासकामे झाली. समाजहिताचे कोणते निर्णय सरकारने घेतले. सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फायदा सर्वसामान्य जनतेला कसा होऊ शकला याची मांडणी झाली पाहिजे; परंतु आपण काय काम केले. जनतेच्या हिताचे कोणते निर्णय घेतले हे ज्यांना सांगता येत नाहीत किंवा सांगण्यासारखे काही नसते ते नेते, पुढारी वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानत आहेत.

कोणत्याही निवडणुका असल्या तरीही ‘सत्ताधारी’ टार्गेट केले जातात. कोणत्याही निवडणुकीत सत्ताधारी हेच टीकेंच्या केंद्रस्थानी असतात. हल्ली वैयक्तिक स्वरूपात टीका केली जाते. निवडणुका म्हटल्या की, विकासावरची चर्चा, केलेली विकासकामे यावर चर्चाच होताना दिसत नाही. निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार, शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या गाठीभेटी, होणारा संवाद, वैयक्तिक संवादावरच निवडणुकीत भर देण्यात येत आहे. यामुळे एकीकडे निवडणुकीचे कार्यकर्ते, पुढारी यांची धावपळ आणि दिवाळीतील उत्साही वातावरण अशा परिस्थितीत मतदार मात्र दिवाळीच्या फराळाचा आस्वाद आणि निवडणुकीतील टीकाटिपणीचे फटाके याचा आनंद घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.