
लोकशाही न्यूज नेटवर्क
जवळपास संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना विरोधातील एकांड्या शिलेदाराप्रमाणे भाजपला आजपर्यंत शरण न गेलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याची दाट चिन्हे आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्षे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार होते. देशातील अनेक राज्यं भाजपच्या ताब्यात जात असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा गड टिकवून ठेवला होता.
मात्र, सोमवारी जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता याठिकाणी भाजपची (BJP) सत्ता येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 जागांची गरज आहे. मतमोजणीच्या सध्याच्या कलानुसार, भाजपने 157 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी तृणमूल अवघ्या 115 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता येणार आहे. हे भाजपसाठी ऐतिहासिक यश मानले जात आहे.
यापूर्वी 2016 आणि 2021 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये तितक्याच इर्ष्येने लढून ममता बॅनर्जी यांनी भाजपची डाळ शिजू दिली नव्हती. मात्र, यंदा भाजपने कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच, असा चंग बांधला होता. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अमित शाह हे पश्चिम बंगालमध्ये स्वत: सूत्रं हलवत होते. पश्चिम बंगाल निवडणुकीचा प्रचार आणि मतदान या काळात अमित शाह हे अक्षरश: पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून बसले होते. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचे भाकीत केले होते.
पश्चिम बंगालमध्ये 24 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान झाले होते, तेव्हा अमित शाह यांनी भाजप 152 जागांपैकी 110 जागी विजय मिळवेल, असा अंदाज वर्तवला होता. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला 170 जागांवर विजय मिळेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. अमित शाह यांच्या तोंडातून बाहेर पडलेले हे वाक्य तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे.
या निवडणुकीसाठी भाजपने आपली संपूर्ण यंत्रणा पश्चिम बंगालमध्ये उतरवली होती. या निवडणुकीच्या मतदानावेळी तब्बल दोन लाख सीआरपीएफ जवान आणि कडेकोट बंदोबस्त पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आला होता. तसेच या निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीमेतंर्गत जवळपास 90 लाख मतदारांची नावे निवडणूक यादीतून काढून टाकली होती. ही गोष्ट पश्चिम बंगालच्या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे दिसत आहे.

