विहिरीत सापडलेल्या कारमधून बेपत्ता दाम्पत्याचे मृतदेह सापडले

0

विहिरीत सापडलेल्या कारमधून बेपत्ता दाम्पत्याचे मृतदेह सापडले

तीन दिवसांनंतर झाला उलगडा

मलकापूर (प्रतिनिधी) : तेलंगणातून जळगाव–खान्देशातील विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी तब्बल तीन दिवस चाललेल्या मोहिमेला अखेर शनिवारी पूर्णविराम मिळाला, मात्र अत्यंत हृदयद्रावक स्वरूपात. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील दाट झुडपांनी झाकलेल्या एका विहिरीत त्यांची कार सापडली आणि त्या कारमधूनच पती–पत्नीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. २९ नोव्हेंबर दुपारी सुमारे २.२० वाजता ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.

सीतापूरम (तेलंगणा) येथील सिमेंट उद्योगात नोकरी करणारे पद्मसिंह दामू पाटील (४९) आणि पत्नी नम्रता (४५) हे एमएच १३ बीएन ८४८३ क्रमांकाच्या चारचाकीतून २७ नोव्हेंबर रोजी डोकलखेडा येथे होणाऱ्या लग्नासाठी निघाले होते. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत नातलगांशी संपर्कात असलेले दाम्पत्य अचानक गायब झाले. दोघांचेही फोन बंद लागल्याने कुटुंबीयांनी तणावाखाली शोधमोहीम सुरू केली.

टोलनाका रेकॉर्ड आणि शेवटचे लोकेशन

पोलिस तपासात दाम्पत्याने ६.३१ वाजता बाळापूर टोलनाका पार केल्याची नोंद आढळली. त्यानंतर मोबाईलचे अंतिम लोकेशन वडनेर भोलजी परिसरात थांबले. बेपत्ता तक्रार नोंदवल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पसरली. मात्र २८ नोव्हेंबरपर्यंत कोणताही ठोस पुरावा हाती लागला नव्हता.

विहिरीत कार दिसताच उलगडले रहस्य

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गालगतच्या सर्व विहिरी, नाले आणि झुडपांमध्ये तपास मोहीम सुरू झाली. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशावरून एपीआय गजानन कौळासे आणि त्यांच्या पथकाने मोठ्या प्रमाणात शोध घेतला. चौथी विहीर तपासल्यानंतर पाचव्या विहिरीत अडकलेली कार दिसताच संपूर्ण प्रकरणाचा सुगावा लागला.

रेस्क्यू पथकाची धाव; क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर

शनिवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन तपासाचा आढावा घेतला होता. दुपारी कार आढळल्याचे समजताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ओम साई फाउंडेशनच्या रेस्क्यू टीम, नांदुरा फायर ब्रिगेड आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. सायंकाळपर्यंत दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

घातपात की अपघात ?

मृतांच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून खून असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणालाही त्यांनी थेट जबाबदार धरले असून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

घटनेमागील नेमके कारण, दाम्पत्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांकडून अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.