लोकशाही न्यूज नेटवर्क
मलकापूर ;- नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे राहत असलेली अत्यंत गरीब कुटुंबातील एक महिला बावीस वर्षा आधी हरवली होती ती आज तब्बल २२ वर्षानंतर आपल्या घरी सुखरूप पोहोचलीये.. गेल्या २२ वर्षांपासून केरळ राज्यातील कासरगोड येथील स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर ही समाजसेवी संस्था तिचा सांभाळ करीत होती,
तब्बल २२ वर्षानंतर आई तिच्या मुलीला भेटल्याने मुलीसह नातेवाईकांचे ही अश्रू अनावर झाले होते,
नांदुरा तालुक्यातील अलमपूर गावच्या उषाबाई मधुकर काकडे, ह्या २००० साली अलमपूर येथील आपल्या राहत्या घरून निघून गेल्या होत्या . कुटुंबाने अथक प्रयत्न करूनही २२ वर्षे उषाबाईचा थांगपत्ता लागला नव्हता, २००५ मध्ये त्यांना केरळच्या कासरगोड येथील स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये रेल्वे पोलिसांनी दाखल केले होते .
तेव्हापासून त्यांचे तेथेच वास्तव्य होते. पुनर्वसन केंद्राची पॉली दास यांनी भुसावळ येथील सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधला व हरवलेल्या उषाबाई काकडे यांनी दिलेली माहिती त्यांना सांगितली भुसावळ येथे राहत असलेले सुभाष पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता मलकापूर येथील पत्रकार विजय वर्मा, समाधान सुरवाडे व निखिल चीम यांच्याशी संपर्क साधला यांनी अथक परिश्रम करत नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे राहणाऱ्या उषाबाईच्या कुटुंबाचा शोध घेतला.
व आज स्वतः केरळ येथून पॉली दास ह्या रेल्वेने उषाबाईला घेऊन मलकापूर येथे दाखल झाल्या, व मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्यासमक्ष उषाबाईला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले, यावेळी पती मधुकर,मुलगा गजानन,मुली श्रध्दा,मंगला, बहिणी नलु,रुख्माबाई,कलाबाई यांना बावीस वर्षांनंतर प्रत्यक्षात डोळ्यांसमोर पाहून उषाबाईच्या चेहऱ्यावर हसू फुलले ते पाहून उपस्थितांचे मन सुद्धा भारावून गेले होते,
अलमपूर येथे राहत असलेल अत्यंत हे गरीब कुटुंब,उषाबाई चा पती मधुकर काकडे हे मजुरी करतात,
जेव्हा उषाबाई घरून निघून गेली तेव्हा तिला एक लहान मुलगी होती तेही फक्त चार वर्षाची,आज तिच्या मुलीचे लग्न होऊन तिला दोन मुले आहेत, आपल्या पोटच्या लेकीने आईला बघताच तिचा कंठ भरून आला, लेकीने आईला घट्ट मिठी मारून मोठ्याने रडून आनंदाश्रू वाहू लागली, व आज २२ वर्षानंतर आईचा शोध लागल्याने त्यांची मुलगी व नातेवाईक आनंदाश्रू वाहत होते.