लोकशाही विशेष
हिंदू धर्मात मकरसंक्रांतीला खूप महत्व दिले जाते. इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे येणार पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय. तसेच यादिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात. सवाष्णींना बोलावून सुगडाचे वाण देतात व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतात. यादिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीचे महत्व, मुहूर्त, पूजा विधी..
पूजेला लागणारे साहित्य
समई, तेल, वात, काडेपेटी, उदबत्ती, निरांजन, तूप, फुलवात, धूप, पाट, हळद, कुंकू, अक्षदा, लाल रंगाचा कपडा, रांगोळी, फुलांचा हार, फुले, अत्तर, गजरा, तांदूळ, पाच सुगड (मातीचे लहान सुगडीत घट), हरभरा, मटार शेंगा, कापूस, गाजर, ऊस, तिळगूळ, शेंगदाणे, कच्ची खिचडी (डाळ आणि तांदूळ), बोरं, गव्हाच्या ओंब्या.
सुगड कशी पुजायची ?
मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता. नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून, अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे. आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी. तसेच तुम्ही जिथे सुगडची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी. म्हणजे केर काढून तिथे ओल्या कापडाने पुसून घ्यावे. आता तिथे पाट मांडून त्यावर लाल कापड घालावे.
पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. समई तयार करून प्रज्वलित करावी. उदबत्ती लावून घ्यावी. आता सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, मटार शेंगा, कापूस, हरभरे, तिळगूळ, कच्ची खिचडी, शेंगदाणे इत्यादी भरावे. असे पाच सुगड तयार करून घ्यावे. तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगड ठेवावे. आता सुगड यांना हळदी, कुंकू अर्पण करावे व स्वतःच्या कपाळी लावावे. तसेच अक्षदा अर्पण कराव्या. हारफुले अर्पण करावीत, तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य दाखवावा. निरांजन तयार करून ओवाळावी. मनोभावे नमस्कार करावा. आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा. नंतर पाच सवाष्णींना वाण-वसा करावा. घरातील सर्व थोरामोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा.
पूजेचे महत्व
मकर संक्रांती या दिवशी पूजेचे महत्व खूप मानले जाते. तसेच यादिवशी काळे वस्त्र परिधान करण्याचे देखील महत्व खूप आहे. यादिवशी सूर्य कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून यादवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजा केल्याने खूप पुण्य मिळते. तसेच सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्व आहे. तसेच अनेक ठिकाणी हिंदू धार्मात सकाळी सूर्य देवाची पूजा करतात. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यान आपल्याहातून नकळतपणे घडलेले अनेक पाप नाहीशे होतात. तसेच सकारात्मकता जीवनात प्रवेश करते. तसेच संक्रांती म्हणजे सूर्याचे कर्क राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण होय.
मकरसंक्रांती कशी साजरी करावी
या दिवशी संध्याकाळी सवाष्णींना घरी बोलावून हळदीकुंकू समारंभ करून तिळगूळ आणि आवा (भेटवस्तू) वाटावा. पाहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सवाष्णींना हळद-कुंकु किंवा कुंकवाची डबी वाटावी. त्यानंतर दुसऱ्या वर्षांपासून तुम्हाला आवडत असलेल्या वस्तूंचे वाण देऊ शकतात. मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो.