चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू उत्पादन व विक्रीविरोधात मोठी कारवाई करत मूल शहरातील एका ठिकाणी छापा टाकून तब्बल ९ लाख ५८ हजार ४८५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सुगंधित तंबाखू, पान मसाला, उत्पादन साहित्य तसेच वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन जप्त करण्यात आले.
प्राप्त अधिकृत माहितीनुसार, दि. १६ जून २०२६ रोजी मूल येथील मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ शेख (रा. वॉर्ड क्र. १७, ताडाळा रोड, मूल, जि. चंद्रपूर) यांच्या राहत्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे उत्पादन, पॅकिंग व विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये होल इक्का शिरशा तंबाखू, विमल पान मसाला, व्ही-१ सुगंधित तंबाखू, मजा १०८ शिरशा टोबॅको, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, सुगंधित तंबाखूची सिल्वर पॅकेट्स, उत्पादनासाठी लागणारे साहित्य तसेच एमएच-२७ बीसी-२९७७ क्रमांकाचे वाहन यांचा समावेश आहे. एकूण २५२. ०६ किलो प्रतिबंधित अन्नपदार्थ व साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ शेख तसेच वाहन मालक पियुष राजू महाकाळकर (रा. नंदनवन कॉलनी, नागपूर) यांच्याविरुद्ध मूल पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबर अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, खर्रा व सुगंधित सुपारी यांच्या उत्पादन, साठा, वितरण व विक्रीवर राज्यभर बंदी घातलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) चंद्रपूर प्रवीण उमप व सहाय्यक आयुक्त (अन्न), नागपूर विभाग कृष्णा जयपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय कांबळे व कुणाल मुळे यांनी पार पाडली. यावेळी अन्न व औषध प्रशासनाने इशारा देत म्हटले आहे की, “जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक अथवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. “


