लोकशाही न्यूज नेटवर्क

लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावमधील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. एसीबीच्या पथकाने तब्बल २४ तास राबवलेल्या शोधमोहिमेत चौधरी यांच्या घरातून सुमारे २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचे (जवळपास ३ कोटी) मोठे घबाड जप्त केले आहे. नाशिक आणि जळगाव एसीबीच्या संयुक्त पथकाने ‘इन कॅमेरा’ (व्हिडिओ रेकॉर्डिंग करत) ही संपूर्ण झाडाझडती घेतली.
यापूर्वी २७ जून रोजी जिल्हाधिकारी चौधरी यांच्या चुलत्याने सील केलेल्या घराचे कुलूप तोडून आतून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर काल, २ जुलै रोजी चौधरी यांच्या पत्नी मनीषा चौधरी, नातेवाईक, दोन शासकीय पंच, बँक कॅशियर आणि सोनार यांच्या उपस्थितीत घराचे सील उघडून झाडाझडती घेण्यात आली.
सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्यावर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल आहे. २५ जून रोजी एसीबीचे पथक गेले तेव्हा घर बंद असल्याने ते सील करण्यात आले होते. त्यानंतर नातेवाईकांनी घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने संशय बळावला होता. अखेर काल घेतलेल्या झडतीत हे कोट्यवधींचे घबाड बाहेर आल्याने महसूल आणि पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
छाप्यात काय सापडले?
रोख रक्कम : १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपये (५००, २००, १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांची पुडकी).
सोन्याचे दागिने : ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२ ग्रॅम सोने (यात १६० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे).
खरेदी पावत्या : ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या.
चांदी : ३१ हजार ४१६ रुपये किमतीची १५४ ग्रॅम चांदी.
प्रॉपर्टीचे कागदपत्रे : ६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीच्या वेगवेगळ्या मालमत्तांचे खरेदीखत आणि बक्षीसपत्रांचे दस्तऐवज (हे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर आहेत).


