लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्यवर्ती व वर्दळीच्या भागातील रहिवासी वस्तीत अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या साठ्याला भीषण आग लागल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना हिंगोली शहरात घडली आहे. या ‘अग्नितांडवात’ आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ११ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. गोपाल बासटवार यांच्या घरात फटाक्यांची कोणतीही परवानगी न घेता अवैध साठवणूक करण्यात आली होती, जिथे फटाक्यांची जमवाजमव सुरू असताना अचानक आग भडकली.
या घटनेत अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, रोजच्याप्रमाणे आपले काम आटोपून घराकडे परतणारा एक निष्पाप दुचाकी चालक या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग भडकली त्याच वेळी सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या या दुचाकी चालकाचा दुचाकीवरच होरपळून अक्षरशः कोळसा झाला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो पूर्णपणे जळाल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, डीएनए चाचणीनंतरच त्याची ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाईल.
हिंगोलीचे पोलीस उपाधीक्षक, पोलीस दल, महसूल पथक आणि हिंगोली पालिकेच्या अग्निशमन दलाने तब्बल साडेतीन तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीचा भडका इतका भीषण होता की, परिसरातील ५ घरे आणि अनेक वाहने जळून खाक झाली. मदतीसाठी धावलेले हिंगोली पालिकेचे ३ कर्मचारीही या आगीत गंभीररीत्या भाजले आहेत. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या भीषण आगीच्या तावडीतून शैलेश नांदेडकर आणि त्यांचे कुटुंब आश्चर्यकारक रीतीने सुरक्षित बाहेर पडले. डोळ्यांदेखत घर आणि परिसर जळताना पाहून त्यांनी आपली आपबीती सांगताना ईश्वराचे आभार मानले. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आता जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

