प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराला वेग; आ.सुरेश भोळे व गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत जनसंवाद

0

प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराला वेग; आ. . सुरेश भोळे व गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत जनसंवाद

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून, सोमवारी महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्यासह संपूर्ण पॅनलने शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा श्रीगणेशा केला. रायसोनी नगर येथून प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी प्रथम विश्वेश्वर महादेवाचे दर्शन घेत विजयासाठी साकडे घातले आणि त्यानंतर मतदारांच्या भेटी घेत प्रचाराला सुरुवात केली.

या प्रचार फेरीत आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महायुतीच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आदी मूलभूत नागरी प्रश्न प्रशासनाशी समन्वय साधून प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी नागरिकांना दिली. महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित मतदारांना केले.

प्रचारादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी आमदार सुरेश भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच महायुतीच्या उमेदवारांचे औक्षण करत, पुष्पवर्षाव करून उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, नवनिर्वाचित नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, वैशाली अमित पाटील यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रभागातील नागरिकांनी यावेळी पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व स्वच्छतेसह विविध समस्या नेत्यांसमोर मांडल्या. या सर्व समस्या गांभीर्याने सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे आश्वासन नेत्यांनी दिले. या प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.