महायुतीची बैठक फिस्कटली; भाजप स्वबळावर लढणार?

0

महायुतीची बैठक फिस्कटली; भाजप स्वबळावर लढणार?

अजिंठा विश्रामगृहातील चर्चेला तणावपूर्ण वळण; गिरीश महाजन नाशिककडे रवाना

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २८ डिसेंबर) अजिंठा विश्रामगृह येथे सुरू असलेली महायुतीची निर्णायक बैठक अखेर फिस्कटल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. जागावाटपावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्याने भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे.

या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. शिवसेनेकडून २५ जागांची मागणी करण्यात आली; मात्र भाजपकडून शिवसेनेला १९ व राष्ट्रवादीला ६ जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शिवसेनेकडे २५ ‘विनिंग सीट्स’ असल्याचा दावा करत हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. यामुळे चर्चेत तणाव निर्माण झाला आणि महायुतीतील फूट उघड झाली.

अपेक्षित जागा न मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे अंतर्गत चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर मंत्री गिरीश महाजन पुढील दाराने, तर आ. मंगेश चव्हाण व आ. राजूमामा भोळे मागील दाराने कोणालाही न भेटता विश्रामगृहातून बाहेर पडले.

यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन रेल्वेने नाशिककडे प्रस्थान केले. भाजप ७५ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. याबाबत सायंकाळपर्यंत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.