वाढीव मतटक्क्याचा लाभ महायुतीला होणार ?

अनेक ठिकाणी झाले सत्तापरिवर्तन मात्र महाराष्ट्र आहे अपवाद

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात मतदारांनी जोरदार उत्साह दाखवल्यामुळे गेल्या 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत निघाला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 65.1 टक्के मतदारांनी मतदान केले. महाराष्ट्रात मतटक्का वाढल्याचा फायदा कधी सत्ताधाऱ्यांना तर कधी विरोधकांना झाल्याचे याआधी पहायला मिळाले आहे. त्यामुळे आता वाढलेला मतटक्का महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोणाला सत्तेच्या दारात पोहोचवणार याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. राज्यात याआधी 1995 मध्ये सर्वाधिक अर्थात 71.69 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राज्यात प्रथमच गैरकाँग्रेस अर्थात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे आता वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार प्रचार मोहीम रंगली होती. भाजपने ‘बंटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या घोषणांनी निवडणुकीतील रणनीती बदलली. तर त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भावनात्मक आवाहन केले होते. यात महागाई, भ्रष्टाचार तसेच अदानी कंपनीचाही मुद्दा होता.

मतदान किती वाढले ?

राज्यात 2014 मध्ये मतदान चार टक्के वाढले. त्यानंतर राज्यात सरकार बदलले होते. त्यावेळी 63.38 टक्के मतदान झाले. भाजपने 125 तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. मात्र, राज्यात गेल्या 30 वर्षांत कमी मतदान झाल्यावर आहे तेच सरकार परत सत्तेवर आल्याचेही प्रसंग आहेत. 2009 मध्ये कमी मतदान झाले, त्यानंतर काँग्रेस 82 आणि एनसीपी 62 जागा जिंकून सत्तेत आली. शिवसेना-भाजपला 110 तर मनसेला 13 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजप-शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काय होणार हे आता येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

 

टक्का वाढला… सत्ता टिकली

निवडणुकीचा आजवरचा कल पहिल्यास जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो, तेव्हा सत्तापरिवर्तन होते. परंतु महाराष्ट्र याबाबत अपवाद आहे. अनेक वेळा मतदानाचा टक्का वाढल्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाही झाला आहे. 2024 च्या लोकसभेत मतदानाचा टक्का वाढल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. यावेळी 61.39 टक्के मतदान झाले. त्यात महाविकास आघाडीला 43.91 टक्के तर महायुतीला 42.71 टक्के मतदान झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.