महावितरणचा राज्यातील ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक !

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
महावितरणच्याही वीज ग्राहकांना तब्बल 39 हजार 567 कोटी रुपयांच्या दरवाढीचा मुंबईतील वीज ग्राहकांनंतर आज राज्यभरातील ग्राहकांना झटका बसला आहे. वीज नियामक आयोगाने रात्री उशिरा महावितरणच्या वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे.

त्यानुसार 2023-24 मध्ये 2.9 टक्के तर 2024-25 मध्ये 5.6 टक्क्यांची दरवाढ होणार आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे वाढीव वीज दरामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या घरगुती वीज ग्राहकांबरोबरच औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांचे आर्थिक गणित पुरते बिघडणार असल्याचे दिसत आहे.

महावितरणने बहुवार्षिक वीज दर निश्चितीअंतर्गत जानेवारीमध्ये 67 हजार कोटी रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगाकडे (एमईआरसी) सादर केला होता. त्यावर जनसुनावणी झाल्यानंतर एमईआरसीने दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार घरगुती वीज ग्राहकांना पुरवल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेच्या दरात एक रुपयापासून तीन रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. यावरून घरगुती विजेच्या दरात 20-25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या सुमारे एक कोटी 80 लाख घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल फुगणार असल्याचे निश्चित झाले आहे.

वीज आयोगाने पुढील दोन वर्षांसाठी 2.9 आणि 5.6 टक्के एवढय़ा वीज दरवाढीला मंजुरी देतानाच 39 हजार 567 कोटी रुपयांच्या वसुलीला परवानगी दिली आहे. या रकमेत 2019 पासूनच्या विविध आकाराची थकबाकी आहे. सदर रकमेच्या वसुलीसाठी आयोगाने ऍव्हरेज बिलिंग रेटमध्ये (एबीआर) पहिल्या वर्षी 7.25 टक्के तर दुसऱया वर्षी 14.75 टक्के दरवाढ करण्यास परवानगी दिल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले. त्यामुळे आयोगाने कमी वीज दरवाढ केल्याचे वरकरणी दिसत असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मोठय़ा रकमेची बिले येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

घरगुती ग्राहकांचा वीज दर (रुपयांमध्ये)

वीज वापर सध्याचा दर नवा दर
(युनिट) (2023-24)
0-100 3.36 4.41
101-300 7.37 9.64
301-500 10.37 13.61
500 पेक्षा जास्त 11.86 15.57

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.