लोकशाही न्यूज नेटवर्क
मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना वीजबीलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. त्यानुसार जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार, रविवार आणि सोमवार (29 ते 31 मार्च) या सुट्टीच्या दिवशी सुरू राहतील. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिल थकबाकीची रक्कम कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम जळगाव परिमंडळात सुरू आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करुन घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करुन चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.