वीज चोरांवर कारवाई थंड बस्त्यात..!

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्ह्यात महावितरण तर्फे विजांच्या बिलाच्या थकबाकींवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. 200 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरण कंपनीने जाहीर केले. विजेचा वापर केल्यानंतर त्याचे बिल भरण्याची जबाबदारी संबंधित ग्राहकांची असते. त्यांनी विजेचे बिल भरले पाहिजे. परंतु काही कारणास्तव काही ग्राहक वापरलेल्या विजेचे बिल भरण्यास असमर्थ असतात. याचा अर्थ ते वीज बिलाचा भरणा न करता विजेचे बिल बुडवत आहेत, अशातला प्रकार नाही. ते वीज चोरी करणारे चोर नाहीत. परंतु महावितरण कंपनीकडून मात्र चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होतोय.

महावितरण कंपनीतर्फे विजेची विक्री त्यांनी दिलेल्या विजेच्या मीटरद्वारे बिल भरणा होत असताना महावितरणला तोटा का होतो? याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महावितरणतर्फे निर्माण होणारी वीज आणि निर्माण झालेली झालेल्या विजेच्या विक्रीत तफावत कुठे निर्माण होते? हे साधे सोपे गणित असताना तोटा का होतो? त्याचे एकमेव कारण म्हणजे विजेची होणारी चोरी होय. विजेची चोरी मोठ्या प्रमाणात होत असताना ही चोरी रोखण्याऐवजी नियमित विजेच्या बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांवर या ना त्या कारणास्तव कारवाई केली जाते. तोटा होतो म्हणून विजेच्या दरवाढ करण्यात येते. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना बसतो. बिचाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या विजेचे अव्वाच्या सव्वा वाढवलेले दर परवडत नाहीत. आधीच जीवनाशक वस्तूंच्या भावात कमालीची वाढ झाल्यामुळे वाढत्या महागाईमुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्याला विजेच्या बिलाचा भरणा करणे नियमितपणे शक्य होत नाही. त्यामुळे तो ग्राहक थकबाकीदारांच्या यादीत मोडतो. त्यामुळे त्याच्या घराचा विजेचा पुरवठा खंडित केला जातो. त्याचा परिणाम त्याला काही दिवस अंधारात काढावे लागतात.

एकंदरीत आम्ही थकबाकीदारांची वीज खंडित केली. त्यात आमचे काय चुकले ? असे महावितरण कंपनीचे म्हणणे असले, तरी ते चुकीचे आहे. कारण कसलेही वीज बिल न भरता जे आकोडे टाकून वीज वापरतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? मध्यंतरी जळगाव शहरातील शनिपेठ भागातून विजेच्या तारावर आकोडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांचे आकोडे मोठ्या प्रमाणात काढण्यात आले. अमुक इतके आकडे महावितरण तर्फे जप्त करण्यात आले, अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु ज्यांनी आकोडे टाकून विजेची चोरी केली त्याचेवर काय कारवाई केली? या प्रश्नाचे उत्तर काहीही कारवाई झाली नाही असे होय.

ज्यांनी महावितरणची वीज चोरून मोफत वापरली त्यांना महावितरण तर्फे मुभा दिली जाते, आणि जे वीज सर्विस मीटरद्वारे वापरतात त्यांची वीज खंडित केली जाते, हा कुठला न्याय म्हणावा ? बरे आकोडे टाकून विजेची चोरी करणाऱ्यांचे आकोडे काढून टाकल्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या आकोडे आणून वीज चोरतात. असे अनेक वेळा निष्पन्न झाले आहे. परंतु वीज चोरी होणार नाही, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे कसलाही प्रयत्न केला जात नाही. त्यामागेही इंगित असल्याचे बोलले जाते. हे लोक आकोडे टाकून विजेची चोरी करतात किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये विजेची चोरी होते. त्याकडे वीज वितरण करून पद्धतशीरपणे दुर्लक्ष होते असे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे विजू चोरीतील वीज चोरीला महावितरण कंपनी जबाबदार आहे.

मध्यंतरी जळगाव शहरातील वीज वितरणाचे त्यांना कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले. होते तेव्हा त्या खाजगी कंपनीकडून प्रथम पाऊल वीज चोरीवर नियंत्रण आणण्याचे पाऊल टाकून अशाप्रकारे वीज कारवाईमध्ये सुधारणा केली होती. ज्या भागात आकोडे टाकून वीज चोरी होते त्या भागात केवळ केबल टाकण्यात आले होते. बंद केबल मधून चोरी होणे शक्यच होत नाही. परंतु खाजगी मीटरला विजेची वितरण दिल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून असहकार्याची भूमिका घेतली गेली. कर्मचाऱ्यांच्या दबावापोटी खाजगी कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर येरे माझ्या मागल्या, महावितरणमध्ये पुन्हा सुरू झाली. परिणामी थकबाकीदारांची वीज जरूर खंडित करावी, तथापि विजेची चोरी करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई होत नाही, ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.